विविध अडथळ्यांवर मात करून दापोडीमधील वीजपुरवठा सुरळीत

पुणे,  २१ ऑक्टोबर २०२२: महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रात झालेल्या बिघाडामुळे महावितरणचा दापोडी ११ केव्ही वीजवाहिनीचा वीजपुरवठा सहा ते सात तास बंद राहिला. यासह पावसाची हजेरी व साचलेल्या पाण्यामुळे या वीजवाहिनीमध्ये विविध ठिकाणी व फिडर पिलर बॉक्समध्ये आर्द्रता निर्माण होऊन एकामागे एक बिघाड होत गेले. मात्र महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामे करीत दापोडीमधील गणेशनगर, आनंदवन, सुंदरबाग, गगनगिरी या परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३.३० पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला.

याबाबत माहिती अशी, की महापारेषणच्या खडकी ५१२ केव्ही उपकेंद्रामध्ये गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या किर्लोस्कर २२/११ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सहा ते सात तास बंद पडला होता. महापारेषणने केलेल्या दुरुस्ती कामानंतर मध्यरात्री १२ वाजता या उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरु झाला. मात्र सहा ते सात तास वीजपुरवठा बंद राहिल्याने तसेच पावसाची हजेरी व साचलेल्या पाण्यामुळे दापोडी ११ केव्ही वीजवाहिनीवरील फिडर पिलर, भूमिगत वीजवाहिनीमध्ये विविध ठिकाणी एकामागे एक बिघाड होत गेले. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर पावसात विविध पथकांद्वारे दापोडी ११ केव्ही भूमिगत वाहिनीची केबल टेस्टींग व दुरुस्तीचे कामे केली. नेहरू चौकातील भाजीमंडईमध्ये एका फिडर पिलरमध्ये मोठा बिघाड झाल्याचे दिसून आले. मात्र स्थानिक अतिक्रमणाने फिडर पिलर पूर्णतः वेढल्याने दुरुस्तीसाठी तेथे जाणे शक्य नव्हते. तरीही मोठ्या जिकरीने या फिडर पिलरची दुरुस्ती करण्यात आली. त्या व इतर ठिकाणच्या दुरुस्ती कामानंतर शुक्रवारी (दि. २१) पहाटे ५.३० वाजता दापोडीमधील नेहरू चौक तसेच महामार्गालगतच्या ६० टक्के परिसरात वीजपुरवठा करण्यात आला.

तथापि साचलेल्या पाण्यामुळे भूमिगत वाहिनी व फिडर पिलरमधील बिघाड वाढतच गेले. फिडर पिलरपाशी टाकलेल्या कचऱ्याची दुर्गंधी व चिखलामध्ये जाऊन विविध ठिकाणी अविश्रांत दुरुस्ती कामे करण्यात आली. त्यानंतर ११ केव्ही दापोडी वीजवाहिनीवरील उर्वरित गणेशनगर, आनंदवन, सुंदरबाग, गगनगिरी या परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३.३० पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.