शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे, 17/1/2022 : इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलांसाठी आणि मुलींसाठी 100 प्रवेश क्षमतेची प्रत्येकी एक अशी दोन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. पुणे शहरात सुरु करावयाच्या या वसतिगृहांसाठी सर्व सोईसुविधायुक्त खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती संगिता डावखर यांनी केले आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षापासून ही दोन वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये प्रवेश क्षमतेनुसार खोल्या असणे आवश्यक असून वीज, पाणी, शौचालय, स्नानगृह आदी सर्व प्राथमिक सुविधा आवश्यक आहेत.

ही वसतिगृहे सुरू होण्याच्या दृष्टीने इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या वसतिगृहाच्या परिसरातील इच्छुक इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.105/104, विश्रांतवाडी रोड, येरवडा स्टेशनसमोर, येरवडा, पुणे (दूरध्वनी 020-29706611) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.