पुणे: उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार प्रकरण माजी आमदाराच्या मुलाला अटक

हडपसर, दि. २५/०७/२०२२: उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कारप्रकरणी मागील वर्षंभरापासून फरार असलेल्या समाजवादी पक्षाच्या माजी आमदार पुत्राला हडपसर आणि वाराणसी पोलिसांनी संयुक्तरित्या अटक केली. तो पुण्यातील हडपसर परिसरात अलिशान इमारतीत भाडोत्री राहत होता. याप्रकरणी अपर पोलीस महानिदेशक (वाराणसी) यांनी आरोपीची माहिती देणाNयाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

विष्णु मिश्रा (वय ३४) असे अटक केलेल्याचे नाव आहे. उत्तर प्रदेश पोलीसांचे पथक त्याचा शोध घेत होते.

आरोपी विष्णु मिश्रा याचे वडील विजय मिश्रा हे उत्तरप्रदेशातील भदोईचे ४० वर्ष आमदार होते. मात्र, सामुहिक अत्याचारात त्यांचा मुलगा विष्णूचा सहभाग असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे उत्तरप्रदेश पोलिसांचे तपास पथक आरोपीचा शोध घेत होते. मागील दहा महिन्यापासून मिळून येत नसल्याने पोलीसांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित झाल्या होत्या. तपासादरम्यान आरोपी मिश्राचे नातेवाईक पुण्यात राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यांच्या मदतीने आरोपी पुण्यात वास्तव्य करत असल्याचे समजले. त्यामुळे १० दिवसांपुर्वी उत्तरप्रदेश पोलीसांचे पथक पुण्यात दाखल झाले.

हडपसर पोलिसांच्या मदतीने पथकाने विष्णू मिश्रा याला अटक केली. त्याला लष्कर न्यायालयात हजर करुन ट्रान्झिट रिमांड घेऊन उत्तर प्रदेशात नेले जणार आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, निखील पवार, भगवान हंबर्डे, एस.सोनवणे यांच्यासह वाराणसी एसटीएफचे पथकातील एसीपी शैलेश सिंग, पोलीस निरीक्षक श्रीवास्तव, पोलीस उपनिरीक्षक अंगत यादव, हवालदार राहुल सिंग यांनी केली.