October 18, 2025

दुसऱ्या ‘एम्पॉवर हर फाउंडेशन’एआयटीए-एमएसएलटीए १ लाख रकमेची अखिल भारतीय मानांकन महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत सोनल पाटील हिला विजेतेपद

पुणे, 17 ऑक्टोबर 2025: एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे आणि पीएमडीटीए, ऍथलेटिक्स बीएनबी,भारत स्पोर्ट्स इव्हॉल्युशन, मायमेंटल कोच, योल्कशायर आणि पॅरेंट्स ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित दुसऱ्या ‘एआयटीए-एमएसएलटीए एक लाख रकमेची अखिल भारतीय महिला मानांकन टेनिस स्पर्धेत एकेरीत महाराष्ट्राच्या सोनल पाटील हिने विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत आकृती सोनकुसरे व दिशा बेहेरा यांनी विजेतेपद पटकावले.

पाषाण येथील अनिकेत वाकणकर टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित कोल्हापूरच्या सोनल पाटीलने चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या डेनिका फर्नांडोचा6-3, 5-7, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना तब्बल 3 तास 15मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये आठव्या गेममध्ये सोनल हिने डेनिकाची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये सोनल 5-3 अशा फरकाने आघाडीवर असताना नवव्या, अकराव्या गेममध्ये डेनिकाने सोनलची सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सोनलने जोरदार खेळ करत चौथ्या, सहाव्या गेममध्ये डेनिकाची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा सहज जिंकून विजेतपदावर शिक्कामोर्तब केले.

सोनल हि संजय घोडावत विद्यापीठात कला शाखेत तिसऱ्या वर्षाला शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ऑगस्ट मध्ये डेक्कन जिमखाना येथे पार पडलेल्या याच एआयटीए एमएसएलटीए 1लाख पारितोषिक रकमेच्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावले होते.

दुहेरीत अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरे हिने दिशा बेहेराच्या साथीत गुजरातच्या आरुषी रावळ व आंध्रप्रदेशच्या चंदना पोतुगरी यांचा 6-4, 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक प्रशस्तीपत्र व रोख रकमेची पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सौरजेंदू मेद्दा, स्पर्धा संचालक संदीप नूलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिकेत वाकणकर, अपूर्वा कुलकर्णी, अरविंद ईश्वरलाल, माय मेंटल कोचचे डॉ. स्वरूप सावनुर, योल्कशायरचे वरद देशपांडे, स्पर्धा निरीक्षक प्रणव वाघमारे, आदित्य चौघुले आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: महिला:सोनल पाटील(2)(महाराष्ट्र)वि.वि.डेनिका फर्नांडो(4)(महाराष्ट्र) 6-3, 5-7, 6-2;
दुहेरी गट: अंतिम फेरी:आकृती सोनकुसरे(महाराष्ट्र)/दिशा बेहेरा(कर्नाटक)वि.वि.आरुषी रावळ(गुजरात)/ चंदना पोतुगरी(आंध्रप्रदेश)6-4, 7-5.