लष्कराच्या दक्षिण विभागाने पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी साजरा केला ‘पायदळ दिवस’

27 ऑक्टोबर 2022: देशरक्षणासाठी त्याग व बलिदान करणाऱ्या पायदळातील सर्व जवानांना 76 व्या ‘पायदळ दिवसा’निमित्त लष्कराच्या दक्षिण विभागाने पुणे इथे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक या पदकांनी सन्मानित, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जय सिंह नयन यांनी स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. या वेळी पायदळाचे विद्यमान आणि निवृत्त जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक या पदकांनी सन्मानित निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. व्ही. कुलकर्णी यांनी निवृत्त जवानांच्या वतीने पुष्पचक्र वाहिले.

1947 साली 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्करातील पायदळाच्या शीख रेजिमेंटचे जवान प्रथमच श्रीनगर विमानतळावर उतरले. त्यामुळे श्रीनगरच्या वेशीवर आलेले पाकिस्तानातील कबैली घुसखोर मागे वळले आणि जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानाच्या पाठिंब्याने होत असलेली घुसखोरी रोखणे शक्य झाले. पायदळातील त्या जवानांच्या शौर्याची आठवण म्हणून दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी ‘पायदळ दिवस’ किंवा ‘शौर्य दिवस’ साजरा केला जातो.

थकवून टाकणाऱ्या अवघड परिस्थितीतही देशाची सेवा करताना दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून शौर्य गाजवणाऱ्या पायदळातील जवानांचे लेफ्टनंट जनरल जय सिंह नयन यांनी आपल्या संदेशात कौतुक केले. देशाचे प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्व राखण्यासाठी सर्वच श्रेणीच्या जवानांनी आपल्या आधीच्या शूरवीरांच्या कृतींमधून प्रेरणा घ्यावी व आपल्या देशाप्रती कर्तव्याबाबत ठाम राहावे, असे प्रोत्साहन त्यांनी जवानांना आपल्या संदेशातून दिले.