घरकामगारांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कामगार आयुक्तांना देणार निवेदन

पुणे, १५ जून २०२१ : घरकामगारांच्या भीषण परिस्थितीकडे सरकार आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी घरेलू कामगार संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिवसनिमित्ताने कामगार आयुक्त यांना निवेदन दिले जाणार आहे. शहरातील घर कामगारांच्या समस्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेने (आय.एल.ओ) 16 जून 2011 रोजी घरेलू कामगारांसाठी “घरकामगारांसाठी सभ्यतेला धरून काम’ या शीर्षकाखाली जी 189 सनद मंजूर केली, त्याची उद्या दशकपूर्ती होत आहे. मात्र भारतात घरकामगारांच्या कामाचे नियमन करण्यासाठी सर्वसमावेशक कायदा नसल्याने घरकामगारांना अनेक समस्या उदभवत आहेत. ध्यस्थितीत घरकामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असताना, अशा व्यापक कायद्याची तातडीने गरज आहे. विशेषत: अन्न आणि इंधना सारख्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना किमान वेतन सूचित करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच घरकामगारांना प्राधान्य देवून लसीकरणाद्वारे संरक्षित करणे आवश्‍यक आहे. कोव्हिड- मुळे देशभर आर्थिक संकट निर्माण झालेले असताना घरेलू कामगारांना काही अर्थसहाय्य आणि पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची तातडीने गरज आहे, असे घरेलू कामगार संघटनेतर्फे सांगण्यात आले. याच मागण्यांचे निवेदन कामगार अयुक्तांकडे सादर केले जाणार आहे.