शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा सदैव प्रेरणास्थान असेल : गृहमंत्री अमित शाह

पुणे, 19/12/2021: देशाच्या अवकाशात ज्यावेळी अंधःकाराचे वातावरण होते, दुरदूरवर आशेचा किरण नव्हता. स्वराज्य शब्द उच्चारणे हेही भीती निर्माण करणारे होते. त्यावेळी युवा शिवाजी महाराजांनी तरुणांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि संपूर्ण स्वराज्यासाठी समर्पित केले. पुढे याच स्वराज्याचा दोन तृतीयांश भारतात विस्तार झाला. अष्टप्रधान मंडळाने उत्तम प्रशासनाचे उदाहरण जगाला दाखवून दिले. म्हणूनच पुणे महापालिकेने उभारलेला सिंहासनाधिष्ठ पुतळा सदैव प्रेरणा देईल, असे प्रतिपादन देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण गृहमंत्री शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री शाह बोलत होते. महापौर मोहोळ अध्यक्षस्थानी असलेल्या या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

शाह पुढे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवून दिला. बाबासाहेबांनी स्वातंत्र्यानंतरच्या भारताला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले. त्यांनी निर्माण केलेले संविधान जगभरात किती श्रेष्ठ आहे हे आपण पाहत आहोत’.

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, ‘संविधानाला मजबूत करण्याचे काम नरेंद्र मोदी सरकार करत आहे. दलितांचे आरक्षण काढले जाईल, अशी अफवा पसरवली जाते. पण असे काहीही होणार नाही.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य करताना आदर्श कारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. पुणे शहराचा गाडा हाकत असताना महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर असावा आणि महापालिका कारभाऱ्यांना सातत्याने प्रेरणा मिळत राहावी, या उद्देशाने महापालिका मुख्यालयात पुतळा असावा, अशी मनोमन इच्छा होती. ती आता पूर्ण होते आहे याचा विशेष आनंद आहे’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर उपमहापौर वाडेकर यांनी आभार मानले.