बाणेर टेकडीची लचकेतोड थांबवा; महापालिकेला नागरिकांचे साकडे

पुणे, 29/01/2022: पुणे महापालिका, स्मार्ट सिटी, आणि खाजगी जागा मालक, विकसक हे चहूबाजूंनी बाणेर टेकडीचे व गायरानाचे लचके तोडत करत आहेत. हा प्रकार त्वरित थांबविण्यासाठी या ठिकाणी जागा मोजणी करून टेकडी फोड थांबवावी अशी मागणी या भागातील नागरिक व सामाजिक संघटनांनी केली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना याचे निवेदन देण्यात आले आहे.

बाणेर मधील सर्वे क्रमांक ७ आणि ४९/१ हा भूखंड सरकारी गायरान गावच्या गुरास मोफत असून त्यावर बी.डी.पी. आरक्षण आहे. तसेच हा भूखंड पुणे महापालिकेच्या देखभालीत आहे.
जैवविविधता व अनेक पर्यावरणीय दृष्ट्या बहुमोल असे हे गायरान/टेकडी अखंड ठेवत त्याचे संवर्धन ही नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य व केंद्र शासनाची जबाबदारी आहे. पण येथे तोडफोड सुरू केल्याने टेकडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे या टेकडीची नागरिकांच्या उपस्थितीत जागा मोजणी करून घ्यावी.
तसेच भूखंडाचे दर ३ महिन्या नंतर सॅटेलाईट इमेज/उपग्रह चित्र घेण्यात यावे व महापालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर ते त्वरित उपलब्ध असावेत, या भूखंडाच्या ७/१२ वर बी.डी.पी. आरक्षणाची नोंद करून घ्यावी.या संपूर्ण भूखंडावर २४ तास, वर्षाचे ३६५ दिवस सुरक्षारक्षक तैनात असावेत, अशी मागणी केली आहे.
भविष्यातील मोठा धोका टाळण्याच्या हेतूने बाणेर-बालेवाडी, औंध, पाषाण, सूस, सोमेश्वरवाडी मधील नागरिक व पुण्यातील अनेक संस्थांनी आज २८ जानेवारी २०२२ रोजी औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना पत्र दिले.
वसुंधरा अभियान बाणेर, वसुंधरा स्वच्छता अभियान, डाॅ. गारूडकर वसुंधरा अभियान, समस्त ग्रामस्थ बाणेर, औंध विकास मंडळ, बाणेर पाषाण लिंक रोड विकास समिती, पाषाण एरिया सभा, पुनर्भरण फाऊंडेशन, देवनदी स्वच्छता अभियान, रामनदी स्वच्छता अभियान, सेव्ह पुणे हिल्स यांनी हे निवेदन दिले आहे.