साखळीचोरीच्या गुन्हयातील अट्टल आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

पुणे, ५ जून २०२१: नागरिकांकडून जबरदस्तीने सोन्याची साखळी आणि मोबाईलसारख्या वस्तू हिसकावून त्या चोरून नेणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यासहित इतर राज्यांमध्येदेखील आरोपीने या प्रकारचे गुन्हे केले असून , तब्बल 5 गुन्ह्यात तो ‘पाहिजे’ असल्याची माहिती पोलिसांना तपासाअंती समजली. त्यानुसार पुणे पोलिसांनी या अट्टल आंतरराज्यीय गुन्हेगाराला अटक केली आहे.

या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव फिदा हुसेन मनुआली इराणी, वय २३, असे असून तो शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट येथील इराणी वस्तीत राहतो.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शिरूर येथे पुरुषोत्तम प्रकाश बेहरा यांच्या हातातून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या अज्ञात व्यकीचा शोध घेत असताना,गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, फिदा हुसेन ही व्यक्ती कोणताही कामधंदा करत नसून, त्याच्याकडे असलेल्या करडया रंगाच्या सुझुकी बर्गमॅन या दुचाकीचा वापर करून, तो रोडने जाणाऱ्या लोकांची लुटमार करतो. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे-नगर रोडने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना संबंधित दुचाकी दिसली. तिचा पाठलाग करुन कोरेगाव भिमा येथे आडवून फिदा हुसेन याला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे दोन चोरीचे मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा ९०,०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळाला.

त्याच्याजवळील मोबाईलबाबत चौकशी केली असता, विवो कंपनीचा मोबाईल हा कोरेगाव भिमा ग्रीन गार्डन हॉटेल जवळ एका व्यक्तीकडून जबरदस्तीने हिसकावल्याचे तर दुसरा ओपो कंपनीचा मोबाईल कोरेगाव भिमा जवळील गंधर्व गार्डन्स हॉटेल जवळ एका व्यक्तीला, ‘तू तुझे मोबाईलमध्ये मुलींचे फोटो का काढले? असे म्हणून, त्याचा मोबाईल हिसकवल्याचे त्याने सांगितले. आणखीन चौकशी केली असता त्याने कोरेगाव भिमा, शिक्रापूर व दौंड परिसरातही अशा प्रकारचे आणखीन गुन्हे केल्याचे त्याने सांगितले. हे सर्व गुन्हे फेब्रुवारी ते मे या काळात घडले आहेत.

आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी पुणे शहर येथे १८, हैद्राबाद (तेलंगणा) येथे ११ व गोवा येथे २ असे चैन, मोबाईल हिसकवण्याचे एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे,पोलीस हवालदार महेश गायकवाड,निलेश कदम, सुभाष राऊत,जनार्दन शेळके, पोलिस नाईक राजू मोमीन,अजित भुजबळ, गुरु गायकवाड, मंगेश थिगळे, गुरु जाधव, अक्षय नवले, काशिनाथ राजापुरे यांनी केली आहे.