September 12, 2025

सीईटी प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप, युवासेनाकडून तातडीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा

मुंबई, ४ जून २०२५: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) निकालांच्या जाहीरतेत आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (कॅप) दिरंगाई होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य युवासेनाने राज्यातील सीईटी सेलवर या विलंबाविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून असे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

युवासेनाचे सहसचिव कल्पेश यादव यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीएस्सी नर्सिंग, लॉ, एमबीए यांसारख्या काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असले तरी, फार्मसी, ॲग्रीकल्चर, इंजिनीअरिंग सारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचे निकाल अजूनही विलंबाने प्रसिद्ध होत आहेत. परिणामी, प्रवेश प्रक्रियाही सुरुवात झालेली नाही.

अशा परिस्थितीत राज्यातील सुमारे ५० खासगी आणि अभिमत विद्यापीठे आपापल्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात करत असून, याचा गैरफायदा घेऊन आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता असताना, सामान्य विद्यार्थी व पालकांना प्रवेशासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कल्पेश यादव म्हणाले, “सीईटी सेलकडून वेळापत्रक व प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाचा फायदा खासगी विद्यापीठांना होत आहे. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या संकटात आहेत.” त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करावे, अन्यथा विद्यार्थ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.