विद्यार्थ्यांनी बांबुपासून बनविले आकाशदिवे आणि फटाके..!!

पुणे, २४ सप्टेंबर २०२२: दिवाळसणात घराला स्वतः बनवलेला आकाशदिवा लावण्यासाठीची सुरुवात लहानग्यांनी आजपासूनच सुरू केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित बांबूपासून आकाशदिवे बनविण्याच्या कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स पार्क आणि कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून बांबूपासून आकाशदिवे बनविण्याची कार्यशाळा शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. विद्यापीठातील बांबू हस्तकला आणि कला केंद्र (भाऊ) येथे सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत ही कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेत शाळकरी विद्यार्थी आपल्या पालकांसह सहभागी झाले होते. यावेळी मुलांनी आकशदिवा बनविण्यासोबत नाग गोळी आणि रॉकेट बनविण्याचे देखील प्रशिक्षण घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना सायन्स पार्कच्या मुख्य विज्ञान संवादक डॉ. हर्षदा बाबरेकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ.राधाकृष्ण पंडित, प्रा. पुजा मोरे आदींनी प्रोत्साहन दिले.

ही कार्यशाळा दिवाळी अगोदर पुन्हा होणार असून इयत्ता चौथीपासून पुढे कोणालाही या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. यासाठी शुल्क भरून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी http://event.unipune.ac in/ या लिंक वर जात सीएसइसी या सेक्शन मध्ये जात नोंदणी करावी. याबाबत अधिक माहितीसाठी http://sciencepark.unipune.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.