पुणे विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन

शंतनु वेल्हाळ

पुणे, ११ जुलै २०२२: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी संघटनांनी आज विविध मागण्यांसाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर घंटानाद आंदोलन केले. विद्यापीठ प्रशासनाकडून शुल्क दरवाढीबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

“२०२० पर्यंत पीएचडीचे वार्षिक शुल्क हे ₹१३,३९० होते, मात्र आता ते ₹२६००० करण्यात आले आहे जे आम्हा विद्यार्थ्यांना परवडण्यासारखे नाही,” असे तुकाराम शिंदे, विद्यार्थी संशोधक, म्हणाले.

ओम भुदडे, इतिहास विभागाचा विद्यार्थी म्हणाला, “विद्यापीठ प्रशासनाकडून वसतिगृह आणि परीक्षांसाठी तिप्पट शुल्कवाढ करण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर आम्हाला एवढे शुल्क भरणे कठीण आहे. आम्ही कुलसचिवांना भेटलो परंतु त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.”

विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.