October 24, 2025

सुदर्शन केमिकल्सतर्फे २३५ विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान

पुणे, ११/०४/२०२५: “आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज व सुधा सीएसआर फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे. सुदर्शन कंपनीसह येथील कर्मचाऱ्यांनी जपलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे. हा उपक्रम आता केवळ ‘सुधा सितारा’ राहिला नाही, तर खऱ्या अर्थाने ‘सुधा सितारे’ झाला आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. हुशार व गरजू विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी सुधा सितारा शिष्यवृत्ती संजीवनी ठरत असल्याचेही अदिती तटकरे म्हणाल्या.

सुदर्शन केमिकलच्या वतीने सुधा सीएसआर अंतर्गत मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रोहा व महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील २३५ विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये १८५ मुली, ४९ मुले व १२ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राठी स्कुलमध्ये आयोजित शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यावेळी सुदर्शन केमिकल्सच्या पीपल्स प्रॅक्टिस हेड शिवालिका पाटील, सुदर्शन रोहा साईट हेड विवेक गर्ग, सीएसआर हेड माधुरी सणस आदी उपस्थित होते.

अदिती तटकरे म्हणाल्या, “गुणवत्तेवर आधारित हा उपक्रम आहे. मुलींमधील गुणवत्ता हेरून त्यांना अर्थसहाय्य व प्रोत्साहनपर मार्गदर्शन देण्याची ही कल्पना विलक्षण आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास सहाशे विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू राहावा. संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याला जातोय, याचा आनंद आहे. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढेल.”

राजेश राठी म्हणाले, “संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टयांना अनुसरून सुधा सीएसआर महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात कार्यरत आहे. या सीएसआर कार्यक्रमातून आजवर लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे काम झाले आहे. ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, आत्मविश्वास वृद्धी आणि भविष्यातील येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित केली जात आहे.”

शिवालिका राजे यांनी सांगितले की, सुदर्शन कंपनीत ‘डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन’ अंतर्गत उपक्रम राबवले जात आहेत. आपण समाजातही हेच मूल्य रुजवत आहोत. यावेळी सुधा सीएसआर उपक्रमांतर्गत, मुलींप्रमाणेच मुलांना आणि दिव्यांगांना दत्तक घेऊन मदत केली जात आहे. या वर्षीच्या सुधा सितारा उपक्रमाची व्याप्ती संपूर्ण रायगड जिल्ह्यात झाली, याचा आनंद आहे.

प्रास्ताविकात माधुरी सणस म्हणाल्या, “सामाजिक जाणिवेतून २०१९ मध्ये या उपक्रमाला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षात शेकडो मुलींना सुधा सितारा शिष्यवृत्ती दिली आहे. गरजू मुलामुलींना शिक्षण आणि मेंटॉरशिप देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सुदर्शन केमिकल्समधील कर्मचार्‍यांनी या मुलामुलींचे पालकत्व स्वीकारले आहे.”

विवेक गर्ग यांनीही उपस्थितांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात याआधी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींच्या यशोगाथा ऐकून उपस्थित भारावून गेले. विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदर्शन कंपनी आणि त्यांचे कर्मचारी समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी खूप चांगले काम करत आहेत, अशी भावना पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

स्वाती मोहिता आणि संजय कचरे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. विशाल घोरपडे यांनी आभार मानले.