एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ओमर सुमर व सेजल भुतडा यांना विजेतेपद

पुणे, 20 मे 2022: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात मुंबईच्या ओमर सुमर याने तर, मुलींच्या गटात नागपूरच्या सेजल भुतडा यांनी विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत मुलांच्या गटात सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे यांनी तर, मुलींच्या गटात प्रिशा शिंदे व वैष्णवी चौहान यांनी विजेतेपद पटकावले.

 

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित मुंबईच्या ओमर सुमर याने सार्थ बनसोडेचा 3-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 2तास मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना सार्थने ओमरची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या ओमरने तिसऱ्या गेममध्ये सार्थची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये ओमरने सुरेख खेळ करत सार्थची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये ओमरने आपले वर्चस्व कायम राखत हा सेट 6-2 असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ओमर हा एनआयओएस मध्ये 12वी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमीत प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

 

मुलींच्या गटात अंतिम फेरीत सातव्या मानांकित नागपूरच्या सेजल भुतडा हिने आठव्या मानांकित डेनिका फर्नांडोचा 7-5, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सेजल ही रामनगर भरत विद्यालय शाळेत 9वी इयत्तेत शिकत असून एनडीएचए,नागपूर येथे प्रशिक्षक विशाल लांडगे व नवीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या वर्षांतील हे दुसरे विजेतेपद असून याआधी हैदराबाद येथे मागील आठवड्यात झालेल्या 16 वर्षांखालील स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

 

दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे यांनी साहिल तांबट व अर्णव कोकणे यांचा 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. साहिल तांबटला पायाला दुखापत झाल्यामुळे सामन्यातून माघार घेतली व त्यामुळे सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे यांना विजेते घोषित करण्यात आले. मुलींच्या गटात प्रिशा शिंदे व वैष्णवी चौहान या जोडीने सेजल भुतडा व अभिलिप्सा मल्लिक यांचा 6-4, 3-6, 10-8 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण वितरण स्पर्धा संचालक संदीप नुलकर आणि प्रणव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: मुले: ओमर सुमर(महा)[5]वि.वि.सार्थ बनसोडे(महा)3-6, 6-3, 6-2;

 

मुली: सेजल भुतडा(महा)[7]वि.वि.डेनिका फर्नांडो(महा)[8]7-5, 6-2;

 

दुहेरी:अंतिम फेरी: मुले: सार्थ बनसोडे/सिद्धार्थ मराठे वि.वि.साहिल तांबट/अर्णव कोकणे[3] 6-3 सामना सोडून दिला;

 

मुली: प्रिशा शिंदे/वैष्णवी चौहान वि.वि.सेजल भुतडा/अभिलिप्सा मल्लिक 6-4, 3-6, 10-8.