September 24, 2025

नरेंदर व साहीलच्या कामगिरीमुळे तमिळ थलायवाजचा. युपी योद्धाजवर दणदणीत विजय

मुंबई, 10 जानेवारी 2024: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत युपी योद्धाज संघाचा 46-27 असा दणदणीत पराभव करताना तमिळ थलायवाज संघाने सलग सात पराभवांची मालिका खंडित केली.
एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत नरेंदरने चढाईत 14 गुण आणि साहिल गुलियाने पाच पकडी करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी वेगवान प्रारंभ करताना तमिळ थलायवाज संघाने योद्धाजवर 7व्या मिनिटाला पहिला लोन चढवून 11-2 अशी झटपट आघाडी मिळवली. नरेंदर आणि अजिंक्य हे दोघेही उत्कृष्ट चढाया करीत असताना योद्धाज संघाचे परदीप नरवाल व सुरेंदर गिल हे मुख्य आक्रमक अपयशी ठरले. विजय मलिकच्या एकाकी झुंजीनंतरही योद्धाज संघ मध्यांतराला 11-19 असा पिछाडीवर होता.
उत्तरार्धात ही याचीच पुनरावृत्ती झाली. नरेंदर च्या दोन सुपर रेड मुळे तमिळ थलायवाज संघाने योद्धाजवर दुसरा लोन चढवताना आघाडीत भर घातली. 26व्या मिनिटाला तमिळ थलायवाजकडे 29-15 अशी आघाडी होती.
परदीप नरवाल साठी हा सामना सपशेल अपयशी ठरला. 11 चढायामध्ये त्याच्या सात वेळा पकडी झाल्या. 30व्या मिनिटाला योद्धाजचे केवळ तीन खेळाडू शिल्लक होते व त्यांचा संघ 15 गुणांनी पिछाडीवर होता.
नितीन पणवरच्या सुपर टॅकल मुळे योद्धाजने अखेरच्या टप्प्यात झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पुरेसा ठरला नाही. नरेंदर च्या आणखी एका सुपर रेड मुळे तमिळ थलायवाजने योद्धाजवर तिसरा लोन चढवीत आठ सामन्यातील पहिल्या विजयाची नोंद केली. योद्धाज साठी हा सलग चौथ्या पराभव होता.