September 24, 2025

२३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान रंगणार १० वा गानसरस्वती महोत्सव

पुणे, दि. ७ फेब्रुवारी, २०२४ :गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा ‘गानसरस्वती महोत्सव’ या वर्षी शुक्रवार दि २३ फेब्रुवारी ते रविवार दि २५ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान पुण्यात रंगणार असल्याची माहिती नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर यांनी दिली. या महोत्सवाची ही दहावी आवृत्ती असेल.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे शुक्रवार दि २३ आणि शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान महोत्सवाचे अनुक्रमे पहिले व दुसरे सत्र संपन्न होईल. यानंतर रविवार दि २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १२:३० दरम्यान तिसरे सत्र तर सायं ४ ते रात्री १० दरम्यान महोत्सवाचे चौथे व शेवटचे सत्र संपन्न होणार आहे. सदर महोत्सव सशुल्क असून महोत्सवाचे सीझन तिकीट हे रु. २०० इतके असणार आहे, अशी माहितीही पणशीकर यांनी यावेळी दिली.

ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या गानसरस्वती महोत्सवाचे हे दहावे वर्ष असून नवोदित कलाकारांसोबतच सुप्रसिद्ध कलाकारांची कला रसिक प्रेक्षकांना अनुभविता येणार असल्याचेही पणशीकर म्हणाले.

शुक्रवार दि २३ फेब्रुवारी रोजी (सायंकाळी ५ ते रात्री १०) होणाऱ्या पहिल्या सत्राची व यावर्षीच्या महोत्सवाची सुरुवात युवा कलाकारांच्या तालवाद्याच्या त्रिवेणी आविष्काराने होईल. यामध्ये अभय नायमपल्ली (कर्नाटकी गिटार), मानस कुमार (व्हायोलिन) आणि ईशान घोष (तबला) यांचे सादरीकरण होईल. यानंतर सुप्रसिद्ध गायिका विदुषी कौशिकी चक्रबर्ती यांचे गायन होईल. ज्येष्ठ बासरीवादक पं रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या (शनिवार दि २४ फेब्रुवारी) दिवसाची सुरुवात सायं ५ वाजता सौरभ काडगांवकर यांच्या दर्जेदार गायनाने होईल. यानंतर ज्येष्ठ गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांचे गायन होईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप सुप्रसिद्ध सतारवादक पं नीलाद्री कुमार यांच्या सतार वादनाने होईल.

सकाळच्या वेळेत रंगणारे गानसरस्वती महोत्सवाचे सत्र हे कायमच आकर्षण असते. याही वर्षी रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी महोत्सवाचे तिसरे व सकाळचे (सकाळी ८ ते दुपारी १२:३०)
सत्र रंगणार असून आश्वासक गायक कलाकार जशन भूमकर यांच्या गायनाने त्याला सुरुवात होईल. यानंतर पं मिलिंद रायकर आणि त्यांचे शिष्य व सुपुत्र यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन सहवादन होईल. सुप्रसिद्ध गायक पं जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने तिसऱ्या सत्राचा समारोप होईल.

महोत्सवाच्या चौथ्या व शेवटच्या सत्राची सुरुवात (सायं ४ ते रात्री १०) कथक नृत्यांगना विदुषी शर्वरी जमेनीस यांच्या नृत्याविष्काराने होईल. यानंतर युवा कलाकार शंतनू गोखले संतूर वादन करतील. यानंतर ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण पं विश्वमोहन भट यांचे मोहनवीणा वादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे सुपुत्र व गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य पं रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने १० व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप होईल.

गानसरस्वती महोत्सवाचे सिझन तिकीट हे रु. २०० इतके असणार असून दि. ८ फेब्रुवारी पासून बुक माय शोवर ती उपलब्ध असतील. यासोबतच दि. १५ फेब्रुवारी पासून बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि टिळक स्मारक या ठिकाणी देखील रसिकांना तिकिटे उपलब्ध होऊ शकणार आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.