September 12, 2025

सातव्या सतार नवाज उस्ताद बाले खान महोत्सवाला आजपासून सुरुवात

पुणे, दि. १४ जून, २०२५: पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. महोत्सवाचे हे सातवे वर्ष असून सदर महोत्सव एरंडवणे येथील गणेशनगरमध्ये डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न होत आहे.

सतार नवाज उस्ताद बाले खान यांचे घराणे ‘सताररत्न’ या पदवीने ओळखले’ जाते. सतार हे वाद्य दक्षिण भारतात रुजविण्यात या घराण्याचा मोठा वाटा असून सतार नवाज उस्ताद बाले खान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सतारवादक रईस बाले खान दरवर्षी पुण्यात या महोत्सवाचे आयोजन करीत असतात.

यावर्षीचा महोत्सव पद्म विभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांना समर्पित असणार असून आज ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खान, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कन्नड संघाच्या उपाध्यक्षा इंदिरा सालीयान, पंडित सुधाकर चव्हाण, महोत्सवाचे आयोजक प्रसिद्ध सतारवादक रईस बाले खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या गायनाने महोत्सवाला सुरुवात झाली. किराणा घराण्याचे आश्वासक गायक असलेल्या विराज यांनी यावेळी राग पटदीप ची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी धन धन भाग ही विलंबित एकतालातील बंदिश सादर केली. यानंतर त्यांनी ‘पिया नही आयी…’ हा तीन तालातील छोटा ख्याल सादर केला. यानंतर त्यांनी राग बसंत मुखारी गायला. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या सुप्रसिद्ध भजनाने त्यांनी समारोप केला. अभिजित बारटक्के (तबला) व पं. अविनाश दिघे (संवादिनी) यांनी यावेळी साथसंगत केली.