December 7, 2025

ससून रुग्णालयाने दिलेली क्लीन चीट म्हणजे उंदराने मांजराची साक्ष काढणे – सुषमा अंधारे

पुणे, १८ एप्रिल २०२५ : गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयावर आरोप केले जात आहे. तनिषा भिसे यांचा मृत्‍यू प्रकरणात आत्ता ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून तिन्ही अहवालाची तपासणी करून जो अहवाल देण्यात आला आहे त्यात दिनानाथ रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर कोणताच ठपका ठेवण्यात आलेला नाही अस सांगितले जात आहे. याबाबत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की ससून रुग्णालयाने दिलेली चीट म्हणजे उंदराने मांजराची साक्ष काढणे आहे.

पुण्यात आज शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अंधारे म्हणाल्या, “ज्या ससूनमध्ये अनेक गैरव्यवहार आहे आणि ससूनमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली आहे, त्या महिला डॉक्टरवर देखील अनेक आरोप आहेत. अश्या ससूनने डॉ. घैसास यांना क्लीन चीट देणे यात नवल काय आहे. हे शासन कश्या पद्धतीने आरोपींना संरक्षण देते, हे कोरटकर यांच्या प्रकरणात आपण पाहिले आहे.”

तनिषा भिसे कुटुंबीयांनी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशन येथे दीनानाथ रुग्णालयाच्या संदर्भात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी ससून रुग्णालयाला अहवाल तयार करण्याबाबत ९ एप्रिल रोजी पत्र दिले होत. शासनाच्या नियमानुसार ससून रुग्णालयाकडून ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यांच्‍यासह, स्त्रीरोग विभागप्रमुख, औषधशास्त्र विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, भूलशास्त्र विभागप्रमुख, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख अशा सहा जणांची समिती तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून बैठक घेत चर्चा करत काल संध्याकाळी तो अहवाल सादर करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत तनिषा भिसे यांच्‍या मृत्‍यूबाबत आरोग्य विभाग उपसंचालक, धर्मादाय सहआयुक्त समिती आणि मातामृत्यू अन्वेषण समितीचे अहवाल सादर करण्यात आले. त्‍यातच आता ससूनच्‍या समितीचा अहवाल महत्त्वाचा मानला जात असताना हा अहवाल पोलिसांना सादर करण्यात आला असून दिनानाथ रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर कोणताच ठपका ठेवण्यात आलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार :

तनिषा भिसे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की “राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी भिसे कुटुंबाला शब्द दिला होता की या प्रकरणात कारवाई करू. मात्र अजूनही कारवाई झालेली नाही. आमच्या पक्षाच्या वतीने येणाऱ्या गुरुवारी २४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यात दीनानाथ रुग्णालयाबरोबर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अधीक्षक यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करणार आहोत.”