विधी महाविद्यालय रस्त्यावर घरफोडी साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

पुणे, 26 डिसेंबर 2022 : बंद सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी पाच लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना विधी महाविद्यालय रस्त्यावरील कांचनगल्लीत घडली.
याबाबत ओंकार हिरलेकर (वय ३६, रा. शुभम अपार्टमेंट, कांचनगल्ली, विधी महाविद्यालय रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिरलेकर कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. हिरलेकर यांची सदनिका बंद होती. चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी १५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा पाच लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

हिरलेकर कुटुंबीय गावाहून परतल्यानंतर सदनिकेचे कुलुप तुटल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करत आहेत.