पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२५ : वाहननिर्मिती, संशोधन व डिझाईन या क्षेत्रातील देशाची गतिमानता आणि गुणवत्ता पाहता, नजीकच्या भविष्यात वाहननिर्मिती क्षेत्रात देश जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मी मंत्री झालो, तेव्हा आपण जगात ७ व्या क्रमांकावर होतो, आज आपण तिसऱ्या स्थानी आहोत, असेही ते म्हणाले. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मॅरिएट येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी ‘प्राज बायोव्हर्स’ या जैव अर्थव्यवस्थेशी संबंधित जागतिक उपक्रमाची घोषणा केली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना गडकरी बोलत होते. डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘होरायझन्स बियॉन्ड ड्रीम्स… अॅज इज व्हॉट इज’ या इंग्रजी पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण यावेळी करण्यात आले.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, हिरो मोटोकॉर्पच्या ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक विक्रम कसबेकर, किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आणि प्राजच्या बायो-एनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे हे याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “देशातील वाहन उद्योग क्षेत्र हे सुमारे १२ लाख कोटींचे उद्योगविश्व असून या क्षेत्राने साडेचार कोटी इतका रोजगार निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे हा उद्योग सर्वाधिक निर्यातक्षमताही राखून आहे. मात्र, या उद्योगाच्या काही बाजू नकारात्मक आहेत. ४० टक्के वायूप्रदूषण हे वाहनांमुळे होते. त्यामुळेच प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाला प्रदूषणरहित, स्वच्छ इंधनाचे पर्याय निर्माण करणे आणि त्यांचा सार्वत्रिक वापर वाढविणे गरजेचे आहे. प्राज इंडस्ट्रीजच्या माध्यमातून डॉ. प्रमोद चौधरी आणि त्यांच्या टीमने यासंदर्भात केलेले कार्य कौतुकास्पद आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आज ग्रामीण अर्थव्यवस्थेत असंतुलन आहे. कारण कृषी क्षेत्राचा वाटा अवघा १२ टक्के आहे, पण आजही देशातील सुमारे ६५ टक्के जनता ही कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. सेवा क्षेत्राचा वाटा मात्र वाढत आहे. हे प्रमाण संतुलित करण्यासाठी पर्यायी इंधनस्रोतांची आवश्यकता आहे. पर्यायी इंधनस्रोत कृषी क्षेत्राला बळकटी देतील. आपला शेतकरी केवळ अन्नधान्य उत्पादक न राहता, तो इंधन उत्पादक होण्यासाठी, वाहन उद्योगाने पर्यायी इंधनस्रोतांना अनुकूल अशी निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.”
मी रस्ते बनवितो, हे सर्वपरिचित आहे, पण माझ्या ६ डॉक्टरेट्स या कृषी क्षेत्रातील कार्याशी संबंधित आहेत. त्यामुळे वाहननिर्मिती उद्योग कृषी क्षेत्राशी संलग्न होणे, मला महत्त्वाचे वाटते. इथेनॉल, हायड्रोजन आणि बांबू, असे नवे इंधनस्रोत आपल्या संशोधनाच्या, नवकल्पनांच्या, स्टार्टअप्सच्या केंद्रस्थानी आले, तर आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होणे शक्य आहे, असेही गडकरी म्हणाले.
भारतामध्ये अन्नधान्याची निर्मिती वाढली आहे, ते ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. काही वर्षांपूर्वी मक्यापासून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात झाली, त्यानंतर मक्याच्या दरात चांगली वाढ झाली. बिहार मधल्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्याचप्रमाणे अन्य धान्याचा वापर करून इथेनॉल तयार केले गेले तर त्याचा शेतकरी वर्गाला चांगला फायदा होऊ शकतो. आपल्याकडे ज्या ठिकाणी पडीक जमीन आहे, तिथे बाबूंची लागवड करून त्यापासून इथेनॉल तयार केले तर प्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास देखील चांगली मदत मिळू शकते, इतकेच नाही तर त्यामधून चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती होऊ शकते असे गडकरी यांनी नमूद केले.
डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणा होते, त्यावर पर्याय म्हणून आपसोमिथेनॉल हा चांगला पर्याय आहे, भविष्य काळात तो देशासाठी वरदान ठरणार आहे. भारतामध्ये चांगल्या प्रकारचे संशोधन सुरु आहे, त्यामुळे भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही. डॉ प्रमोद चौधरी यांनी इथेनॉल क्षेत्रात केलेले काम मोठे असून त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.
‘प्राज बायोव्हर्स’ या उपक्रमाविषयी माहिती देताना प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “प्राज बायोव्हर्स ही संपूर्ण जैव अर्थव्यवस्थेच्या परिसंस्थेला एकत्र आणणारी चळवळ आहे. याद्वारे जैव अर्थव्यवस्थेशी संबंधीत अनेकविध घटक एकत्र येण्यासोबतच नवोपक्रमांना चालना देणे, एकमेकांना आवश्यक सहकार्य करणे, प्रेरणा देणे आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे अशा पद्धतीने एकत्रितपणे काम केले जाईल. याद्वारे आपण देशासोबतच जागतिक पातळीवर देखील शाश्वत विकासासाठी नवीन क्षितिजे शोधू शकू असा आम्हाला विश्वास आहे.”
संजय किर्लोस्कर, विक्रम गुलाटी, विक्रम कसबेकर आणि विशाल सोनी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अतुल मुळे यांनी आभार मानले. चैतन्य राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

More Stories
पुणे: महापालिका निवडणुकीत महायुतीचा दावा; पण मित्रपक्षांची स्वबळावरची मोहीम गतीत
Pune: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील अपघातांच्या विरोधात ‘डिव्हायडरची आरती’; अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन