चिंचवड येथे दिव्यांगांसाठी राज्यातील पहिले स्वतंत्र कोवीड- 19 लसीकरण केंद्र

पिंपरी,२७ एप्रिल 2021: शहरातील ४५ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना करोना लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी चिंचवड येथे दिव्यांग व्यक्तींसाठी राज्यातील पहिले स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारले जाणार आहे. येत्या बुधवार (दि २८) पासून हे केंद्र कार्यरत होईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग कक्ष व रोटरी क्लब ॲाफ पिंपरी यांच्या सहकार्याने चिंचवडमधील संभाजीनगर येथील रोटरी क्लब सभागृह येथे हे केंद्र असणार आहे. याठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. असा उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

पिंपरी चिंचवड शहरात एकूण २१४५ दिव्यांग ४५ वर्षावरील असून ते लसीकरणासाठी पात्र आहेत.

नागरवस्ती विेभागाकडील दिव्यांग कक्ष विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी रोटरी क्लब पिंपरी चे अध्यक्ष मेहूल परमार यांचे समवेत नियोजन केले आहे. सर्व दिव्यांगांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे. लसीकरण केंद्रावर आकुर्डी रूग्णालयाच्या प्रमुख डॅा सुनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय पथक कार्यरत असणार आहे.
कोवीड लसीकरण हे सुरक्षित आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे,पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.