October 27, 2025

‘निवडुंग विठोबा मंदिरा’चा इतिहास ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदु; पालखीच्या दर्शनासाठी पुण्यात लाखोंचा जनसागर

पुणे, २१ जून २०२५ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुणे नगरीत काल आगमन झाले असून, आज दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी आहेत. या पार्श्वभूमीवर नाना पेठ आणि भवानी पेठ परिसरात लाखो वारकरी आणि पुणेकरांची मोठी गर्दी उसळली आहे.

निवडुंग विठोबा मंदिरात तुकाराम महाराजांची पालखी
नाना पेठेतील श्री निवडुंग विठोबा देवस्थान ट्रस्टच्या मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे. हे मंदिर ऐतिहासिक महत्त्व असलेले असून, प्रत्येक वर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत येथे भक्तिभावाने केले जाते.

भवानी पेठेत ज्ञानोबांची पालखी
दरम्यान, भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामी आहे. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा आणि प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहेत. दोन्ही परिसरात भक्कम पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दोन्ही ठिकाणी पुणेकर नागरिक, विविध सामाजिक संस्था, संघटना आणि सेवाभावी मंडळांच्या वतीने वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम राबवले जात आहेत. काही ठिकाणी चहा, फराळ, पिण्याचे पाणी, औषधोपचार यासह मालिश सेवा आणि वैद्यकीय मदत केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत.

पुणे महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंडप, स्लीपिंग अ‍ॅरेंजमेंट, पाणी, स्वच्छतागृहे (ई-टॉयलेट), औषध फवारणी, वीज आणि सुरक्षिततेच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पावसाचा अंदाज लक्षात घेता सभामंडपांमध्ये योग्य छत्रछाया आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

इतिहासाचा ठसा – निवडुंग विठोबा मंदिर
श्री निवडुंग विठोबा मंदिर हे पुण्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. असे मानले जाते की या ठिकाणी पूर्वी एका भक्ताने विठोबाच्या मूर्तीभोवती निवडुंग लावले होते, जेणेकरून कोणीही त्या मूर्तीला अपवित्र करू नये. तेव्हापासून या मंदिराला “निवडुंग विठोबा” हे नाव प्राप्त झाले.