पुणे, १६ जुलै २०२५: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या शाई फेकल्या प्रकरणी आणि त्यांना काळं फसल्या प्रकरणी दीपक काटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दीपक काटे हे भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस असून त्याने अनेक वेळा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे माझे गॉडफादर असल्याचं सांगितल आहे आणि बावनकुळे यांनी देखील दीपक काटे याच्या मागे मी उभा असल्याचं सांगितल आहे यामुळे माझ्यावर जो हल्ला करण्यात आला आहे त्याच मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे असल्याचं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितल आहे.
पुण्यात आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे दोन व्हिडीओ दाखवत या घटनेचे मास्टर माईंड चंद्रशेखर बावनकुळे असल्याचं सांगितल आहे.
या वेळी प्रवीण गायकवाड म्हणाले की माझ्यावरील हा हल्ला साखळीतील एक भाग असल्याचे मी मानतो. आम्ही ज्या विचारधारेचा प्रचार, प्रसार आणि अनुसरण करतो, त्या विचारधारेच्या विरोधात काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्याशी निगडीत वेगवगेळ्या संघटना अशा हल्ल्यांना बळ देतात किंवा त्यांची पाठराखण करतात. त्यासाठी बहुजन समाजातीलच तरुणांची माथी भडकावून त्यांना वापरले जाते. वैचारिक प्रतिवाद करण्याची क्षमता संपते, तेव्हाच असे भ्याड हल्ले केले जातात. माझ्या काही हितचिंतकांनी मला महिन्याभरापूर्वीच याविषयी सूचित केले होते की, यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त नागपूर येथील त्यांच्या एका बैठकीत पुरोगामी विचारांचा संघटनांचा बंदोबस्त करण्याबाबत त्यांची चर्चा झाली आहे. संघ आपली शंभरी अशा प्रकारे साजरी करणार आहे का? परंतु मी गाफील राहिलो हे मी मान्य करतो. मी ज्यांच्या विश्वासावर अक्कलकोट येथे गेलो होतो, त्यांनी माझा पूर्ण भ्रमनिरास केला आहे. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा निषेध, कारवाई किंवा साधारण सहनभूतीही मिळाली नाही. ही गोष्ट संशयास्पद वाटते.हल्लेखोर दीपक काटे याचे असे म्हणणे होते की मी आमच्या संघटनेचे संभाजी ब्रिगेड हे नाव बदलावे, त्यातून संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो. यापूर्वीच मी त्याच्याशी दोन वेळा याबाबत चर्चा केली आहे. त्यांना यातील तांत्रिक अडचणी समजावून सांगितल्या आहेत. तरीही त्यानी हा हल्ला केला, याचा अर्थ वैचारिक प्रतिवाद करण्यापेक्षा व्यक्तिगत शारीरिक हल्ला करून मला संपवणे आणि पर्यायाने मी ज्या लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी संघर्ष करत आहे त्या चळवळीत दहशत निर्माण करणे हा त्याचा हेतू होता याची मला खात्री झाली आहे अस यावेळी गायकवाड म्हणाले.
ते पुढे म्हणाले की भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपला गॉडफादर मानणाऱ्या दीपक काटे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. २०१० मध्ये त्यांनी स्वतःच्या सख्ख्या चुलत भावाच्या हत्येमध्ये सात आठ वर्षे तुरुंगवास भोगला आहे. त्याच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, खंडणी, मारामारी, धमकावणे असे अनेक गंभीर गुन्हे आहेत. अशा गुन्हेगाराला आपल्या पक्षात प्रवेश देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याच्यावरील गुन्हे हे मागील सरकारने त्याच्यावर केलेला अन्याय होता आणि आपण आणि देवेंद्र फडणवीस त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे जाहीर आश्वासन त्याला दिले होते. त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात वादग्रस्त वक्तव्ये, कृत्य करणाऱ्यांना भाजपमध्ये मंत्रीपद, राजकीय पदे, ताकद वगैरे बक्षीस म्हणून दिले जाते. त्या बक्षिसाच्या आशेनेही हे असे तरुण असे गुन्हेगारी वर्तन करायला सज्ज होत आहेत. शिवाय राजकीय वरदहस्त लाभल्याने आपले कुणीच काही करू शकत नाही अशी भावना त्यांच्यात तयार होते आणि त्यांना वापरले जाते.अलीकडेच जानेवारी २०२५ मध्ये दीपक काटे हा व्यक्ती संवेदनशील पुणे विमानतळ याठिकाणी दोन पिस्तूल आणि २८ काडतूसांसह पकडला गेला. मात्र तपास अधिकाऱ्याने कर्तव्यात कुचराई करून दीपक काटेची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयासमोर आणली नाही. त्याची माहिती लपवली. त्यानुसार न्यायालयानेही त्याला जामीन मंजूर करत असताना ‘कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आली नाही’ असे म्हटले आहे. न्यायालयासमोर दीपक काटेची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी आणली नाही. ती जर मांडली गेली असती तर दीपक काटेला या गंभीर प्रकरणात जामीन मिळाला नसता. तपास अधिकाऱ्यावर राजकीय दबाव असल्याशिवाय हे शक्य नाही. ज्या आरोपीला मोका लावून जेरबंद करायला हवे त्याला आपल्या विरोधकांविरोधात अजून गुन्हे करण्यासाठी सरकारने मोकाट सोडले हेच यातून सिद्ध होते.माझ्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये काही बाहेरच्या राज्यातील लोक होते. काहीजण तर पॅरोलवर बाहेर असणारे लोक होते. त्याच्याकडे घातक शस्त्रे होती. मला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने ती आली होती. माझ्यावरील हल्ला ही त्यांची निषेधात्मक कारवाई नव्हती, तर पूर्वनियोजित कट होता. तो सरकार पुरस्कृत होता. हल्लेखोरांवर अक्कलकोट पोलिसांनी सुरुवातीला कोणतीही कठोर कारवाई न करता साधारण अदखलपात्र गुन्हे नोंदवले. त्याला अगदी महत्वाच्या व्यक्तीप्रमाणे वागणूक देण्यात आली. महाराष्ट्राचे पोलिस एवढे लाचार कधीपासून झाले? असा सवाल यावेळी प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपाने अद्याप अशा गुंडांवर पक्ष हकालपट्टीची कोणतीही कारवाई केली नाही, याचा अर्थ हे सर्व त्यांच्या संमतीने सुरू असल्याचा संशय निर्माण होतो. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधी न्याय मंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची ही नैतिक जबाबदारी नाही का, की राज्यात सामाजिक क्षेत्रात लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांवरील अप्शा हल्ल्यांची गांभीयनि नोंद घ्यावी. आम्ही संपण्याची ते वाट पाहत आहेत का?सरकार पुरस्कृत या हल्ल्याचा मी निषेध करणार नाही, पण संभाजी ब्रिगेडच्या इतिहासानुसार जशास तसे उत्तर नक्की देणार. लोकशाहीविरोधी विचारांच्या शेवटाची ही सुरुवात आहे.असा इशारा देखील यावेळी गायकवाड यांनी दिला.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार