पुणे, ७ एप्रिल २०२५ः दीनानाथ रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने ईश्वरी (तिनषा) भिसे यांच्या मृत्यूनंतर प्रशासन देखल या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहत आहे. तसेच यासाठी या प्रकरणी पाच सदस्य असलेली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीद्वारे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पाहणी करत प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली. समितीने सादर केलेल्या अहवालानुसार तनिषा भिसे यांचा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने याबाबत माता मृत्यू अन्वेशषण समितीतर्फे सखोल चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.
दरम्यान अंतिम अहवाल तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार असल्यामुळे तो लवकरच सादर करण्यात येईल. आरोग्य सेवा पुणे मंडळ कार्यालय अंतर्गत स्थापित चौकशी समिती अध्यक्ष डॉ. राधाकिसन पवार यांच्या अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.
तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात विविध संस्था व राजकीय पक्षांद्वारे आक्रोश व्यक्त केला जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालकांना समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. या समितीत पाच जणांचा समावेश असून त्यामध्ये एका स्त्री रोग तज्ञाचाही समावेश करण्यात आला. नियुक्त करण्यात आलेली समितीने दिनानाथ रुग्णालयाची पाहणी करत एक अहवाल सादर केला आहे.
समितीच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष ः
– रुग्णालयाद्वारे तनिषा भिसे यांना सुवर्णकालीन (गोल्डन आवर्स ट्रिटमेंट) उपचार दिले नाही
– तनिषा भिसे यांना सुर्या हॉस्पिटल व मनिपाल रुग्णालय येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. तसेच ३१ मार्च रोजी मनिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
– रुग्णालयातील ग्रीव्हेन्स रिड्रेसल सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकार्यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचारासाठी येणाऱ्या खर्चाबाबत माहिती देत धर्मादाय योजने अंतर्गत दाखल करण्याबाबत कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु तसे झाल्याचे दिसून येत नाही.
– तनिषा भिसे यांच्या प्रकरणात भारतीय वैद्यकीय परिषद (व्यावसायिक आचरण, शिष्टाचार आणि नीतिमत्ता) नियमावली २००२ चे पालन झाले नाही
– भिसे यांचा मृत्यू माता मृत्यू प्रकारातील असल्याने या प्रकरणाची चौकशी माता मृत्यू अन्वेषण समिती करेल व त्यांच्या अहवालाच्या निष्कर्षासह अंतिम अहवाल तयार केला जाईल
प्राथमिक चौकशीनुसार-
चौकशी समितीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देत तनिषा भिसे यांच्या मृत्युबाबतची चौकशी केली. त्यानुसार भिसे यांची तपासणी डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे व रसिका सावंत केली व त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसेच नवजात अर्भक कक्षातील डॉ. शिल्पा कलानी यांची भेट घालून दिली. कमी वजनाची, ७ महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी २ ते २.५ महिने एनआयसीयु उपचार लागतील हे समजावून सांगितले व १० ते २० लाख रुपये खर्च लागेल याबाबत कल्पना दिली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तनिषा यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याची व पैशांतची व्यवस्था करत असल्याचे कळविले. दीनानाथ रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय अधिकृत असून डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे, डॉ.शिल्पा कलानी, रसिका सावंत, मिनाक्षी गोसावी, माधुरी पणसीकर, शिल्पा बर्वे, प्रशासक सचिन व्यवहारे व रवि पालवेकर यापैकी एकाही डॉक्टर किंवा कर्मचाऱ्याने तनिषा भिसे यांना धर्मादाय योजने अंतर्गत पात्र असताना देखील या योजनेतून दाखल करून घेतले नाही. असे देखील चौकशीतून स्पष्ट झाले आहे. यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांना कारवाई करण्याच्या अनुषंगाने शिफारस करण्यात येत आहे.
वैद्यकीय कायदा काय सांगतो-
वैद्यकीय कायद्या प्रमाणे रुग्णाकडे दुर्लक्ष केल जाऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाला उपचार सेवा पुरविणे बंधनकारक. एकदा केस हाती घेतल्यानंतर, डॉक्टरने रुग्णाकडे दुर्लक्ष करू नये किंवा रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाला सूचना न देता केसमधून माघार घेऊ नये. या प्रकरणात भारतीय वैद्यकीय परिषद (व्यावसायिक आचरण, शिष्टाचार आणि नीतिमत्ता) नियमावली २००२ चे पालन न झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयाने तरतुदीचा भंग केला असल्याने, याबाबत नियमानुसार महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम, २०२१ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे.
चौकशी समितीमधील सदस्य –
– डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडल, पुणे अध्यक्ष
– डॉ. प्रशांत वाडीकर, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुगे सदस्य
– डॉ. नागनाथ यम्पल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे -सदस्य
– डॉ. निना बोराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालीका, पुणे सदस्य
– डॉ. कल्पना कांबळे, वैद्यद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे सदस्य

More Stories
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश