मेडिकल असोसिएशन लसीच्या वाढीव किमतीबाबत स्थिरता आणण्यासाठी करणार प्रयत्न

पुणे, २५ मे २०२१: शहरातील खाजगी रुग्णालयात करोना प्रतिबंधक लस वाढीव किमतीला दिली जात असल्याचे निदर्शनास अल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनकडून(आय एम ए) लसीच्या किमतीमध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. खाजगी रुग्णालये लसी थेट विकत घेऊन हे लसीकरण करत आहेत. महापालिका रुग्णालयात लस मिळत नसताना खाजगी रुग्णालयांकडे नागरिकांची ओढ पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये अनेक रुग्णालयाकडून लसीकरणासाठी वाजवी रक्कम आकारली जात आहे. रुग्णालयांना ‘कोव्हीशिल्ड’ लस सहाशे रुपयांना मिळत असताना, साधारण पणे ९०० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात आहे. कंपन्यांमध्ये लसीकरण करण्यासाठी तर सरसकट १२०० रुपयांची रक्कम मागितली जात आहे. अधिकाऱ्यांकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तसेच याबाबत अधिकाऱ्यांनी रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत. तसेच आय एम ए’कडे देखील किंमती बाबत मार्गदर्शिका आखण्याबाबत मागणी केली जात आहे. आयएमएच्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया’चे पुणे विभाग संचालक डॉक्टर संजय पाटील म्हणाले ” रुग्णालयाने साधारण लसीची किंमत तसेच त्याबरोबर लागणारे कर्मचारी आणि तसेच इतर यंत्रणा लक्षात घेऊन किमती निर्धारित कराव्यात. ही सरसकट रक्कम आय एम ए ने ठरवून द्यावी अशी मागणी आमच्याकडे केली जात आहे. आम्ही याबाबत विचार करत आहोत. मात्र सर्वच रुग्णालये आय एम ए ची भूमिका मान्य करतील असेही नाही. स्टोरेज तसेच कर्मचाऱ्यांसाठी येणारा खर्च धरता लसी मागे ९०० रुपये आकारणे योग्य आहे.”