September 24, 2025

सुरेल ‘काफी कानडा’ ने दुसर्या सत्राची दिमाखदार सांगता

पुणे, दि. १४ डिसेंबर २०२३ : विख्यात गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुरेल गायनाने ‘सवाई’ च्या दुसऱ्या दिवसाचा उत्तरार्ध स्मरणीय झाला.

जयपूर अत्रौली घराण्याचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या विदुषी अश्विनी भिडे यांनी सुरवातीला राग काफी कानडा मांडला. विलंबित त्रितालातील ‘लायी रे मदपिया’ ही पारंपरिक बंदिश आणि त्याला जोडून हवेली संगीतातील ‘कान्हकुवर के करपल्लव पर मानो गोवर्धन नृत्य करे’ ही रचना द्रुत त्रितालात त्यांनी सादर केली. अतिशय शांत पद्धतीने रागविस्तार हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. रसिकांना आपल्या गायनातून त्यांनी मंत्रमुग्ध केले.

त्यानंतर अश्विनीताईंनी राग गोधनी मध्ये मध्यलय झपतालातील पारंपरिक रचना सादर केली. द्रुत एकतालात ‘पिहरवा मोरे घर आये’ ही बंदिशही त्यांनी पेश केली. ‘सैया निकस गये’ या रचनेने त्यांनी ‘सवाई’ च्या दुसऱ्या दिवसाची सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) तसेच स्वरांगी मराठे आणि शमिका भिडे यांनी स्वर व तानपुरा साथ केली.