गिर्यारोहकाकडून दिला गेला ‘लेक वाचवा’ हा संदेश

पिंपरी-चिंचवड , दि. १७/०९/२०२२ : गिर्यारोहकांच्या चढाईसाठी उत्तराखंडमधील काला नाग (ब्लॅक पीक) या पर्वतावर चढाई करण्याचा पराक्रम पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी केला आहे. यामध्ये भोसरीतील बाल गिर्यारोहक गिरीजा लांडगे ही सुद्धा सहभागी होती. तिने यावेळी एक साहसी पराक्रम केला. यावेळी तिने पर्वतावर चढाई करत ‘लेक वाचवा लेक जगवा’ हा संदेश दिला. या शिखरावर चढाईची मोहीम दि. २६ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या दरम्यान आखली गेली होती.
या चढाईमध्ये एकूण ८ गिर्यारोहकांचा सहभाग होता. वय वर्षे १३ पासून ते वय वर्षे ५१ पर्यंतचे गिर्यारोहक या चढाईसाठी सज्ज होते. यामध्ये गिरीजा धनंजय लांडगे (१३ वर्षे ), धनंजय सयाजी लांडगे, गोपाल भिमय्या भंडारी, ओंकार सुभाष पडवळ, शालिनी शर्मा, निखिल किसन कोकाटे, सुनिल पिसाळ (५१ वर्षे ), विश्वजीत पिसाळ ( ५० वर्षे ) यांनी सहभाग घेतला. एकूण १५ दिवसांची मोहीम होती.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी उत्तराखंड येथील ६ हजार ९८७ मी. उंचीच्या शिखरावर ६ हजार १० मीटरपर्यंतची यशस्वी चढाई केली. बंदरपूंछ पर्वतरांगेतील अतिदूर्गम व अजस्त्र असा ब्लॅक पीक (काला नाग) पर्वत आणि त्यावर असणाऱ्या हिमभेगा, चढाईसाठी ७५ ते ८० अंश कोनात असणारा तीव्र चढ आणि उणे १५ अंश सेल्सियस असणारे तापमान यामुळे चढाईसाठी अतिकठीण मानला जातो. यामुळे या गिर्यारोहकांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.