पुणे, दि. ७ जुलै २०२५ – महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मिळकत कर विभागाला बिलांचे वाटप झाल्यानंतर यंदाही पहिल्या सव्वा दोन महिन्यांत जवळपास मागील वर्षी इतकेच उत्पन्न मिळाले आहे. मिळकत कर विभागाला यंदा आज संध्याकाळी सात वाजेपर्यत एक हजार ४११ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
महापालिकेने यंदा एक मे रोजी बिलांचे वाटप सुरू केले. चाळीस टक्के सवलतींची नोंद न झाल्याने बिलांचे वाटप करण्यास एक महिना विलंब झाला. पहिल्या दोन महिन्यांत बिल भरणार्या मिळकत धारकांना सर्वसाधारण सभेच्या निर्णयाप्रमाणे ३० जूनपर्यंत बिल भरल्यास सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्के सूट देण्यात आली. परंतू अखेरच्या दिवशी सर्व्हरवर मोठ्या प्रमाणावर ताण आला, त्याचवेळी कर भरणा केंद्रांच्याबाहेर रांगाही लागल्या होत्या. यामुळे प्रशासनाने सूट देण्याची मुदत आजपर्यंत अर्थात सात जुलैपर्यंत वाढविली होती. आज संध्याकाळ पर्यंत तब्बल सात लाख ७५ हजार १४० मिळकतधारकांनी एक हजार ४११ कोटी रुपये कर भरणा केला. रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन कर भरणा करणे शक्य असल्याने यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता कर आकारणी प्रमुख अविनाश सपकाळ यांनी व्यक्त केली.
मागीलवर्षी सात जुलैपर्यंत सात लाख ७८ हजार ५१६ नागरिकांनी एक हजार ४१५ कोटी ६५ लाख रुपये कर भरला होता. मिळकत करातील चाळीस टक्के सवलत, समाविष्ट गावांतील कर संकलनाला असलेली स्थगितीनंतरही मागीलवर्षी एवढे उत्पन्न मिळाले असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. ते म्हणाले, कर विभागात अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नव्याने आलेल्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. थकबाकी वसुलीसाठी आतापासूनच पथके तयार करण्यात येणार आहेत. थकबाकी वसुलीसह नवीन कर आकारणी, आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेण्यास प्राधान्य देण्यात येईल. दुबार मिळकत करांच्या प्रकरणांबाबत निर्णय घेउन वसुलीसाठी प्राधान्य देण्यात येईल. मिळकत कराचे अंदाजपत्रकीय उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांनी वेळेत कर आणि थकबाकी भरून कारवाई टाळावी आणि महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही अविनाश सपकाळ यांनी केले आहे.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?