वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करणार्या पोलिसांच्या चुकांवर पालिकेचे बोट

पुणे, २० ऑक्टोबर २०२२:शहरात होणारी अवजड वाहतूक, बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक; तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर बिनदिक्कतपणे उभारणाऱ्या रिक्षांवर आणि ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई करावी, असे पत्र महापालिकेने वाहतूक पोलिसांना देऊन त्यांना कर्तव्याचे स्मरण करून दिले आहे.

शहरात बंदी असतानाही पार्किंग असतानाही मनमानी पद्धतीने पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन
विभागाने केली आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, सातत्याने होणारा मोठा पाऊस आणि मेट्रोच्या कामांमुळे मागील काही आठवड्यांपासून शहरातील
वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, त्यातच ठिकठिकाणी पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच वाहतूक नियमनाची जबाबदारी असलेले पोलिस गायब झाल्याचे चित्र आहे.

शहरात अनेक ठिकाणी सम-विषम शहरात वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. बंदी
असलेल्या रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक याला कारणीभूत ठरत आहे. बस आणि रिक्षादेखील योग्य ठिकाणी थांबत नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे.
वाहतूक पोलिसांनी बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांना अटकाव करावा, बस आणि रिक्षा थांब्यावरच थांबतील या दृष्टीने उचित कारवाई करावी, असे पत्र वाहतूक पोलिस उपायुक्तांना दिले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.