पुणे, २ डिसेंबर, २०२३ : वाघ हा खऱ्या अर्थाने एक ‘मॅजेस्टिक’ प्राणी आहे. भारतीय समृद्ध संस्कृतीत वाघाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे आजही अनेक आदिवासी जमातींमध्ये वाघदेव म्हणून त्याची पूजा होते. वाघासोबतच इतर अनेक वन्यजीव प्राण्यांसोबत मनुष्य प्राण्याचे नाते जुने आहे. फक्त याची माहिती तरुण पिढीला व्हायला हवी. आपण सांस्कृतिकदृष्ट्या या वन्य जीवांशी जोडले आहोत आणि ते किती महत्त्वाचे आहे हे नव्या पिढीला माहिती असायला हवे, असे प्रतिपादन पुणे विभागीय उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी केले.
पुण्यातील भाषा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने आयोजित कथायात्रेमध्ये झालेल्या ‘व्याघ्र प्रकल्पाची ५० वर्षे’ या विषयावर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात तुषार चव्हाण यांनी उपस्थित वन्यजीवप्रेमींशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार विनोद बारटक्के, भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा व कथायात्रेच्या रचनाकार स्वाती राजे, जयदीप राजे, रणजीत नाईकनवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बारटक्के यांनी चित्रित केलेल्या जंगलातील काही चित्रफितींनी उपस्थितांना जंगलात फेरफटका मारल्याचा आनंद घेता आला. या प्रसंगी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले, “भारतात वाघाची रॉयल बेंगाल टायगर हीच प्रजाती आढळते. २००६ साली संपूर्ण देशात वाघांची संख्या १४०० इतकी होते. २०१८ मध्ये ती २९०० झाली. आज ही संख्या ३७०० हून अधिक इतकी झाली असून हे प्रोजेक्ट टायगरचे यश आहे. आजच्या काळात वाघ वाचविणे हे जंगल वाचविण्यासारखे महत्त्वाचे आहे.” या सर्व गोष्टी सरकारी पातळीवर होत असताना सामान्य नागरिकांना, तरुण पिढीला वन्यजीव संरक्षणासंदर्भात जागृत करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मतही चव्हाण यांनी मांडले. आज अनेक स्वयंसेवी संस्था यासाठी कार्यरत असून सामान्य नागरिकही सरकारी पातळीवर राबविण्यात येणारे उपक्रम आणि संस्थांच्या माध्यमातून होत असलेले उपक्रम यामध्ये सहभागी होऊ शकतात, असे आवाहनही त्यांनी केले.
जन्माला आल्यानंतर केवळ ५० टक्के वाघच जगतात. पहिले दोन तीन महिने हे वाघाच्या बछाड्यासाठी महत्त्वाचे असतात त्यामुळे वाघांचे संरक्षण महत्त्वाचे आहे असे सांगत विनोद बारटक्के म्हणाले, “वाघाच्या लाळेमध्ये औषदीय गुणधर्म असतात, त्यामुळे वाघ आपली कोणतीही जखम ही चाटून साफ आणि बरी करतो.”
प्रोजेक्ट टायगर हा केवळ महराष्ट्रासाठी नसून देशासाठी आहे, असे सांगत तुषार चव्हाण म्हणाले, “आज प्रत्येक आठवड्यात वाघ तस्करीचे दोन गुन्हे समोर येत आहेत. चीनमधील एखाद्या औषधासाठी, नखांसाठी वाघांची शिकार होत आहे. या गोष्टी कमी करायच्या असतील तर सामान्य नागरिकांमध्ये या संदर्भात जागृती व्हायला हवी. जयदीप राजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर स्वाती राजे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन