२०२३ हे वर्ष जगातील भारताचे नेतृत्व प्रस्थापित करणारे – डॉ.शैलेंद्र देवळाणकर

पुणे, दि.१२/०१/२०२३- आजघडीला अन्य देशांचे सरासरी वय ५० च्या जवळपास असताना भारताचे सरासरी वय मात्र ३५ आहे. आपल्याकडे जगाचे नेतृत्व करणारी तरुणाई आहे. जी – २० परिषदेच्या निमित्ताने आपल्याला हीच बाब जगासमोर मांडायची आहे. जी -२० परिषदेसोबत येणाऱ्या वर्षभरात अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि विभागीय संघटनांच्या कार्यक्रम होणार असून त्यातील बहुतांश परिषदांचे प्रतिनिधित्व भारताकडे आहे. त्यामुळेच २०२३ हे वर्ष जगातील भारताचे नेतृत्व प्रस्थापित करणारे आहे असे मत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक व उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लाल महालपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पर्यंत जी-२० शिखर परिषद जनजागृती फेरीचे आज (दि.१२ जानेवारी २०२३) आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच विद्यापीठाशी संलग्न साडेसात लाख विद्यार्थी तसेच प्राध्यापक व सामान्य नागरिकांसाठी देखील उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांचे ‘जी २० अध्यक्षपद: संधी, आव्हाने व युवकांची भूमिका ‘ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. देवळाणकर बोलत होते.  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत तसेच  राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी भूषविले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आणि राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, अतिरिक्त आयुक्त विकास ठाकणे, उपयुक्त संतोष वारुळे व विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे समन्वयक आशिष सांगळे यांनी केले.
सकाळी आठ वाजता लालमहाल येथून या फेरीचा शुभारंभ झाला होता. या फेरीसाठी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे या जनजागृती फेरीची सांगता झाली, त्यानंतर  डॉ.देवळाणकर यांचे व्याख्यान झाले.
डॉ.देवळाणकर म्हणाले, जगातील ७५ टक्के लोकसंख्या ही या जी-२० सहभागी देशांकडे आहे, या देशांकडे जगाचा जवळपास ८५ टक्के बाजार आहे तर विकास दराच्या ७५ टक्के भागही या देशांकडे आहे. त्यामुळे ही परिषद अत्यंत महत्वाची आहे. २०४७ पर्यंत जगातील ३० टक्के मनुष्यबळ हे भारतातून जगात गेलेले असेल असेही डॉ.देवळाणकर यांनी सांगितले. यावेळी डॉ.देवळाणकर यांनी जी २० विषयी सविस्तर माहिती दिली.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतनिमित्त डॉ.प्रभाकर देसाई यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
*डॉ.कारभारी काळे*
भारताकडे तरुणांचे बळ आहेच पण भारतातील वयस्क प्रतिनिधींच्या जाणीवा तरुण आहेत. भारताकडे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा खूप मौलिक ठेवा आहे जो जगासमोर आणण्याची ही जी २० च्या निमित्ताने संधी आहे. तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून आपले पारंपरिक शिक्षण जगासमोर आणण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.
*राजेश पांडे*
जी २० च्या निमित्ताने भविष्याला उज्वल करण्याची संधी निर्माण झाली आहे. ज्या राजमाता जिजाऊंनी आदर्श युवक घडवला आणि ज्यांनी युवकांना प्रेरणा दिली असे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आणि याची सांगड २१ व्या शतकाशी घालत उज्ज्वल भविष्याचा संकल्प आपण सर्वांनी करायला हवा.