पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून तरूणावर वार

पुणे, दि. 07/05/2021: कोयत्याने वार केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून दोघांजणांनी तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी दोघाजणांना वानवडी पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी रामटेकडीतील मगरीन बाई चाळ  परिसरात घडली.
शुभम कांबळे (वय १९) आणि अजय उकीरडे (वय ३०, दोघेही रा. रामटेकडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विकास चव्हाण (वय २५, रा. रामटेकडी ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपुर्वी आरोपींनी विकास चव्हाण यांच्या भावावर कोयत्याने वार केला होता. त्यामुळे विकासने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग आरोपींना होता. दोन दिवसांपुर्वी विकास हे त्यांचा भाउ आकाश आणि मामा नितीन नवगिरे यांच्यासह दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी विकासला अडवून तु आमच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करतो का, आता तुला खल्लास करतो असे म्हणत त्यांच्यावर कोयत्याने वार केला. भांडणात मध्यस्थी केल्यामुळे आरोपींनी नितीन आणि आकाशला धमकी दिली. त्याशिवाय हातातील कोयता हवेत फिरवून आम्ही रामटेकडीचे दादा आहोत, जो कोणी आमच्या नादाला लागेल, त्याला आम्ही खल्लास करू असे ओरडून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटावडे तपास करीत आहेत.