December 15, 2025

मराठी बालसाहित्यात विशेष प्रयोग झाले नाहीत – माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे परखड मत

पुणे, दि. २१ जुलै, २०२४ : ज्या भाषेमध्ये बालसाहित्य समृद्ध असते, त्या भाषांमध्ये वाचन संस्कृती देखील समृद्ध होते असे निरीक्षण आहे. बंगाली भाषेत व्योमकेश बक्षी सारखे पात्र असेल किंवा सुनील गंगोपाध्याय यांनी लिहिलेली पात्र असतील ती बंगाली बालसाहित्यात लोकप्रिय झाली आहेत, त्यांचे इंग्रजी व इतर भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत, ही पात्रे तिथल्या घराघरांत पोहोचली. मात्र मराठी बालसाहित्यात भा. रा. भागवत यांचा ‘फास्टर फेणे’ सोडल्यास लहान मुलांना खिळवून ठेवतील, आपलीशी वाटतील अशी पात्रेच आली नाहीत. त्यामुळे, आपल्याकडे बालसाहित्यात विशेष प्रयोग झाले नसल्याचे प्रकर्षाने जाणवते, असे परखड मत माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले.

सासणे लिखित समशेर कुलूपघरे मालिकेतील ‘भूतबंगला’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील मनोविकास प्रकाशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारत सासणे बोलत होते. शिवाजीनगर येथील अक्षरनंदन शाळेच्या सभागृहात यावेळी वृषाली गटणे यांनी भारत सासणे यांच्याशी संवाद साधला. ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे, मनोविकास प्रकाशाचे आशिष पाटकर, अक्षरनंदन शाळेच्या संस्थापिका विद्याताई पटवर्धन, रीना पाटकर आदी यावेळी उपस्थित होते.

वृषाली गटणे यांनी भारत सासणे यांच्या मुलाखतीमधून समशेर कुलूपघरे हे पात्र उपस्थितांसमोर उभे केले. यावेळी समशेर कुलूपघरेच्या लेखकाशी झालेल्या मनसोक्त गप्पा व गुप्तहेरांच्या धम्माल गोष्टींची मैफलच जणू उपस्थित पालक आणि बालरसिकांनी अनुभविली. यावेळी समशेर कुलूपघरे यांच्या काही कथांचे सादरीकरण अक्षरनंदनच्या विद्यार्थ्यांनी केले.

मी लिहिलेल्या समशेर कुलूपघरे या कादंबरीच्या मालिकेतील पात्राचा जन्मच मुळी गरजेतून झाला आहे असे सांगत भारत सासणे म्हणाले, “भा रा भागवतांचे निधन झाले. त्याच्या आधी त्यांनी फास्टर फेणे हे पात्र लिहिले. ते खूप प्रसिद्ध झाले. त्याची प्रसिद्धी इतकी जास्त होती की त्यावर चित्रपट बनवावा लागला. पण फास्टर फेणे नंतर मराठीमध्ये लहान मुले स्वत: गुंततील, गोष्टींमधून आनंद घेऊ शकतील असे कोणतेच प्रातिनिधिक पात्र बालसाहित्यात निर्माणच झाले नाही. मधल्या काळात काही प्रयोग झाले मात्र, दीर्घकाळ मुलांच्या सोबत राहून नायक आणि त्याच्या मित्र मंडळीचा पसारा निर्माण करणारे व मुलांना जोडून ठेऊ शकेल अशा पात्राची जागा भरल्या गेली नाही. हीच गरज माझ्या लक्षात आली आणि शेरलॉक होम्सने या पात्राच्या प्रेरणेने समशेर कुलूपघरे आणि त्याच्या कथा मी लिहिल्या.”

आपल्या बालसाहित्यात कोणे एकेकाळी एक राजा होता…, आटपाट नगर होते अशी सुरुवात करून अद्भूत रस अर्थात फँटसी निर्माण करायचा प्रयत्न केला जायचा. लहान मुले त्यांचे पालक हे देखील या कथा आनंदाने वाचायचे. मधल्या काळात आपण बालसाहित्यामधून या अदभूत रसाला गाळून टाकले. जादूगार, जादूचा दिवा, जादूचे घोडे या सर्वांना आपण तळघरात बंद करून टाकले. आता पुन्हा त्यांना बाहेर काढायची गरज आहे. हे करीत असताना आपल्याला मागे न जाता याच गोष्टी सद्यपरिस्थितीचा उपयोग करीत पुन्हा सांगण्याची गरज आहे, असे सासणे यांनी नमूद केले.

पुस्तकांमधून, साहसकथांमधून मुलांची कल्पनाशक्ती तरल होते म्हणून ‘अॅलीस इन वंडरलँड’, ‘सिंदबाद’, ‘रॉबिन हूड’, ‘अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा’, ‘पंचतंत्र’, ‘इसापनीती’, ‘श्यामची आई’, भा रा भागवतांच्या सर्व कथा ही पुस्तक मुलांनी आणि पालकांनी वाचायलाच हवी, असे सासणे म्हणाले.

मुले आणि पालक दोहोंनी उत्तम साहित्य वाचायला हवे, दिवसातील काही मिनिटे का होईना मुलांनी वाचले पाहिजेच. वाचन हे साधनेप्रमाणे आहे. या साधनेची सुरुवात कमी वयापासून केली पाहिजे. मुलांना कविता लेखन, पुस्तक लेखन, गीत लेखन काहीही करू द्या, अगदी डायरी लिहू द्यात. त्यांना ज्या भाषेत वाटेल त्या भाषेत वाचन करून द्यात. मुलांमधील लेखक घडवायचा असेल तर त्यांना एकवेळ मदत करू नका मात्र, आवर्जून मोकळीक द्या असा सल्लाही सासणे यांनी दिला.

“पुस्तके ही मुलांना आकृष्ट्य करतात, रोमांचित करता त्यामुळे मुलांच्या आयुष्यात पुस्तकांची उपलब्धता महत्त्वाची आहे. मुले पुस्तक प्रदर्शनात आली की ती पुस्तके फाडतील, खराब करतील म्हणून अनेक पालक त्यांना पुस्तकालाच हात लावू देत नाहीत. मात्र मुलांना पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही पालकांची आहे”, असे सासणे म्हणाले. यासोबतच मुलांआधी पालकांनी देखील वाचले पाहिजे आणि मुलांना वाचून दाखविले पाहिजे. पालकांचे स्वत:चे वाचन चांगले असेल तर ते मुलांना वाचून दाखवू शकतील असा सल्ला भारत सासणे यांनी दिला.

मुलांमध्ये पुस्तकांप्रती उत्कंठा, रोमहर्षकता, उत्सुकता वाढविणे आणि घरात पुस्तक स्नेही वातावरण निर्माण करणे ही पालकांचे जबाबदारी आहे याकडे सासणे यांनी लक्ष वेधले. मुलांना वाचायला सांगून पालक टीव्ही, मोबाईल बघत बसले असे होता कामा नये असेही ते म्हणाले.

राजीव तांबे यांनी गोष्टींच्या स्वरूपात मुलांशी संवाद साधला. यावेळी तांबे यांनी एखादी गोष्ट पाहणे नाही तर नीट पाहणे, त्याचे केवळ निरीक्षण करणे नाही तर त्या बाबीच्या खोलात जाणे, एखादी गोष्ट दिसली की अशी का असे प्रश्न मुलांनी विचारने हेच साहस कथांचे उद्दिष्ट आहे, असे नमूद केले. आशिष पाटकर यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले. रीना पाटकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.