पुणे: शहरात संध्याकाळी पाच ते पहाटे पाच संचारबंदी लागू

पुणे, २८ जून २०२१: कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शहरात सोमवारपासून (दि. २८) दररोज संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यापार्शवभूमीवर पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.


कोरोना रूग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बध लागू केले आहेत. शहरात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे पोलिसांनी बेशिस्तांविरूद्ध कारवाईची मोहित हाती घेतली आहे. त्यानुसार जागोजागी नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि चेकिंगला प्राधान्य दिले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

” संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांनी ओळखपत्र, पुरावा दाखविल्यानंतर त्यांना सोडले जाणार आहे. तसेच रूग्णसेवा, भाजीपाला, अत्यावश्यक सेवेतील वाहन चालकांना सुट दिली जाणार आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असणार आहे.” डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे