पुणे : आंबेगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ;तीन इमारतीमधील पाच फ्लॅट फोडले

पुणे, 14 जून 2021 : – आंबेगाव बुद्रुक परिसरातील तीन सोसायट्यामधील पाच फ्लॅट फोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान, काही फ्लॅटमधून नेमके काय चोरीला गेले हे समजू शकलेले नाही. याबाबत सागर दादासाहेब खेडेकर (वय 31, रा.आंबेगाव बुद्रक) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक परिसरातील सुमन संकल्प बिल्डिंगच्या बी विंगमध्ये खेडेकर राहतात. आठ जून रोजी ते कामाच्या निमित्ताने फ्लॅट बंद करून गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटामधून 3.33 लाख रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी त्याच इमारतीमधील आणखी एक फ्लॅटमध्ये घरफोडी केली आहे. पण, त्याठिकाणाहून नेमके काय चोरीला गेले आहे. हे समजू शकलेले नाही.
चोरट्यांनी शिवदत्त हाईट्‌स मधील एक फ्लॅट फोडल्याचे आढळून आले आहे. रमणा हाईट्‌स मधील दोन फ्लॅट फोडल्याचे रविवारी सकाळी आढळून आले. पण, संबंधित फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी दिली आहे.