महिलांजवळील अडीच लाखांचे दागिने घेऊन चोरट्यांचा पोबारा

पुणे, २८ ऑगस्ट २०२२: साहेबांना मुलगा झाला आहे. त्यानिमित्त ते साड्या वाटप करत असून, तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगत दोन चोरट्यांनी हातचालाकीने महिलांकडील अडीच लाखांचे दागिने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवार वाड्यासमोरच्या समोर भरदुपारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी ५९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या शुक्रवार पेठेत राहण्यास आहेत. त्या व त्यांची बहिण खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. यादरम्यान, दोघेजन त्यांच्याजवळ आले. त्यांनी आमच्या साहेबांना मुलगा झाल्याने ते फुकट साड्या वाटप करत आहेत. तुम्हीही चला, अशी बतावणी केली. त्यांना गळ्यातील दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. त्यानूसार त्यांनी दोन लाख ४० हजारांचे दागिने काढून पिशवीत ठेवले. ती पिशवी चोरट्यांनी त्यांच्याकडे घेऊन हातचालाकीने त्यातील दागिने काढून घेतले व त्यांना पिशवी परत केली व तेथून पोबारा केला.