पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत यंदा दुप्पट मतदान

पुणे, दि.२०/११/२०२२- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट मतदान झाले. सर्व केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया अतिशय उत्साह परंतु शांतापूर्ण आणि शिस्तीच्या वातावरणात पार पडली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधिसभेवर पदवीधर मतदारांमधून एकूण दहा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. १ जून पासून सुरू झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत विद्यापीठाचे दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी काम करत होते.

अतिशय कडेकोट बंदोबस्तात व नियोजनबध्द पद्धतीने ही प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाकडून पार पडली. रविवारी सकाळपासूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील केंद्रासह सर्वच केंद्रांवर मोठा उत्साह होता. दुपारच्या वेळातही अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मतदानासाठी येत होते. संध्याकाळी पुन्हा हा ओघ थोडा वाढत अखेर पाच वाजता केंद्रांवर शांततापूर्ण वातावरण पार पडले.

मुख्य म्हणजे तरुण विद्यार्थ्यांसह, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांनीही या मतदानाला हजेरी लावली होती.

मतदान टक्केवारी
पुणे
पुरुष ७५२८
महिला ३७००
एकूण ११२२८
टक्केवारी २४.८५

अहमदनगर
पुरुष ४८९६
महिला १६८७
एकूण ६५८३
टक्केवारी २४.३

नाशिक
पुरुष ४१७६
महिला १८७६
एकूण ६०४९
टक्केवारी ३७.१४

सिल्वासा
पुरुष १
महिला ५
एकूण ६
टक्केवारी ४२.८६

एकूण
पुरुष १६६०१
महिला ७२६५
एकूण २३८६६
टक्केवारी २६.८५

“विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधरांसाठीच्या निवडणुका आज ७१ मतदान केंद्रांवर अतिशय शांततेत पार पडल्या. सर्व केंद्रप्रमुख, त्यांच्या संस्थांचे संस्थाचालक, विद्यापीठाचे शिक्षक-अधिकारी-कर्मचारी यांनी या निवडणुका यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. सर्व उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे देखील मी मनःपूर्वक आभार मानतो. माननीय कुलगुरू व माननीय प्र-कुलगुरू यांचे मोलाचे मार्गदर्शन या निवडणुकीसाठी लाभले, त्यांचा मी ऋणी आहे.

– डॉ.प्रफुल्ल पवार, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ