सहा लाखांची फसवणूक करून महिलेला जीवे मारण्याची धमकी

पुणे, ५ जुलै २०२१- विश्वास संपादित करून महिलेकडून तब्बल ५ लाख ७५ हजार रूपये घेउन, परत न देता तिची फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर महिलेने पैसे परत मागितल्याचा राग आल्यामुळे एका कुटूंबियाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना मार्च २०१४ ते जून २०२१ कालावधीत नानापेठेत घडली.
सुरेश सुबराव भालेराव (वय ४७), सुरेखा सुरेश भालेराव (वय ४०) , मयूर सुरेश भालेराव (वय ३० सर्व रा. के. के. वस्ती, सिंहगड रस्ता)  अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हलिमा लालसाहेब शेख (वय २६) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी हलिमा यांची आई आणि आरोपी भालेराव कुटूंबिय यांच्यात ओळख आहे. त्यातूनच भालेराव कुटूंबियांनी हलिमा यांच्या आईचा विश्वास संपादित केला. त्यांच्याकडून ५ लाख ७५ हजार रूपये घेउन सहा महिन्यात परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही पैसे देण्यास नकार देउन भालेराव कुटूंबियांनी हलिमा यांच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तक्रारदाराने न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने  पोलीस उपायुक्तांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.