पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे, १९/११/२०२२: शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोखलेनगर, विश्रांतवाडी, लोणी काळभोर परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.

गोखलेनगर परिसरात दुचाकीस्वाराला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. साधना राजेंद्र खैरे (वय ५०, रा. जनता वसाहत, जनवाडी) असे मृत्यू पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वाराच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी महेंद्र तुपसौंदर यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार साधना खैरे रात्री सव्वादहाच्या सुमारास गोखलेनगर परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार साधना खैरे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या खैरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विश्रांतवाडी भागात भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सचिन विजयकुमार पाटील (वय २६, रा. कृष्णानगर, दिघी, आळंदी रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार सचिन सकाळी सव्वासातच्या सुमारास टिंगरेनगर भागातून निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार सचिनला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पाटील याचा भाऊ सोमनाथ (वय २३) याने याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर भागातील म्हातोबाची आळंदी परिसरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसने पादचारी ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.