मंदिरात चोऱ्या करणाऱ्या तिघांना अटक

पुणे, दि. २३/०५/२०२१: शहरातील जैन मंदिर, गणपती मंदिर, म्हसोबा मंदिरातील दानपेट्यातील रक्कम चोरून नेल्याचे गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरलेले मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

गुरूवार पेठेतील श्री नाकोडा भैरवजैन मंदिरात १५ मे रोजी चोरीचा प्रकार समोर आला होता. चोरट्यांनी मंदिरातील चांदीचे पत्रे असलेली दानपेटी चोरून नेली होती. तसेच, आकरा मारूती गणपती मंदिरात दानपेटी चोरीला गेली होती. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. तसेच, समर्थ व फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरात चोरीचे प्रकार समोर आले होते. फरासखाना विभागचे सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या तपास पथकांना मार्गदर्शन करून आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार खडक पोलिसांनी तपास करून रमीज इकबाल हकीम (वय २० रा. भगवा चौक, काशेवाडी) याला अटक केली. त्यानेच जैन मंदिरात चोरी केल्याचे समोर आले. त्याच्याकडून एक लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच, फकडे हौद चौकातील गणेश मंदिरात पाच मे रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी अनिल मिंधा पटेल (वय २८, रा. बुधवार पेठ, मूळ-मध्यप्रेदश) याला अटक केली आहे. तर समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात २७ एप्रिल रोजी झालेला चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरट्याने या मंदिरातील दोन चांदीचे मुकूट चोरले होते. याप्रकरणी पोलिसांनी विनायक बंडू कराळे (वय २२, रा, काशेवाडी, भवानी पेठ) याला अटक केली आहे. त्याच्याकडून आठ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.