३ डिसेंबर पासून सुरू होणार ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकीटविक्री

पुणे, दि. २९ नोव्हेंबर : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकीटविक्री शनिवार दि. ३ डिसेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या वतीने कळविण्यात आली आहे. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल, मुकुंदनगर येथे यावर्षीचा महोत्सव होणार असून यासाठी भारतीय बैठक व खुर्चीची संपूर्ण महोत्सवाची तिकिटे उपलब्ध आहेत. यंदा दैनंदिन तिकिटे उपलब्ध नसतील.

यंदा शनिपार येथील बेहेरे आंबेवाले, कमला नेहरू पार्क येथील शिरीष ट्रेडर्स – बोधनी, कर्वे रस्ता येथील देसाई बंधू आणि अरणेश्वर, सहकारनगर येथील अभिरुची फूड्स या ठिकाणी महोत्सवांची तिकिटे सकाळी नऊ वाजल्यापासून उपलब्ध असतील. रसिकांना डेबिट व क्रेडिट कार्ड वापरूनही तिकिटे खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

खुर्चीचे संपूर्ण महोत्सवासाठीचे सीझन तिकीट ४ हजार रुपये तर भारतीय बैठकीचे सीझन तिकिट पाचशे रुपये इतके आहे. शिवाय विद्यार्थ्यांसाठी सीझन तिकीटाचा दर हा २५० रुपये असून हे तिकीट खरेदी करताना व महोत्सवाच्या ठिकाणी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखविणे अनिवार्य आहे.

महोत्सवाची ऑनलाईन तिकिटे www.esawai.com या संकेतस्थळावर दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून उपलब्ध असतील.