चांदणी चौक येथील वाहतूक रात्री अर्ध्या तासासाठी बंद राहणार

पुणे, 10 ऑक्टोबर 2022: मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू असून १० ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री १२.३० ते १.०० वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार आहे.

सद्यस्थितीत जुन्या पुलाच्या ठिकाणी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या साडे चार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असून चांदणी चौक भागातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली आहे.

वाहतुकीच्या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी केले आहे.