December 25, 2025

विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

पिंपरी चिंचवड, दि. २४/१२/२०२५: विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्याकरिता ३१ डिसेंबर २०२५ राेजी सकाळी १० वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ राेजी रात्री १२ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्याबाबतचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

चाकण ते शिक्रापूर-शिक्रापूर ते चाकण या दोन्ही बाजुकडील वाहतुकीस सर्व प्रकारच्या खाजगी चालकांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावर अनुयायांच्या बसेसना प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि अनुयायांच्या कार, जीप आदी हलक्या वाहनांना प्रवेश असणार नाही.

चाकण आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक, पांजरपोळ चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी जड अवजड, मल्टी अॅक्सल वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची (जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो,ट्रक) वाहने वडगाव मावळ-एचपी चौक म्हाळुंगे-वासोली फाटा किंवा वाघजाई नगर मार्गे -बिरदवडी गाव-रोहकल फाटा- पुणे नाशिक रोड-खेड-मंचर नारायणगाव- आळेफाटा मार्गे अहिल्यानगर येथे जातील. खाजगी हलकी वाहने वडगाव मावळ येथून तळेगाव चाकण रोडने चाकण चौक-खेड- पाबळ -शिरुर मार्गे अहिल्यानगर येथे जातील. आळंदी, कोयाळी आदीमार्गे रसिका हॉटेल चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना शिक्रापूर दिशेने जाण्यास बंदी करण्यात येणार असून ही खाजगी वाहने चाकण मार्गे इच्छितस्थळी जातील.

मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने सेंट्रल चौक देहूरोडमार्गे निगडी-पिंपरी चिंचवड बाजुकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना मनाई करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक सेंट्रल चौकातून मुंबई-बंगळरु महामार्गाने सरळ वाकड नाका चांदणी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. मुंबईकडून एक्सप्रेस महामार्गाने पुणे बाजुकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना उर्से टोलनाका येथुन मुंबई-बंगळरु महामार्गाने मुकाई चौक सेंट्रल चौक मार्गे निगडी-पिंपरी चिंचवड बाजुकडे जाण्यास मनाई करण्यात येणार असून या मार्गावरील वाहने वाकड नाका व राधा चौक येथुन पुणे बाजुकडे जातील.

चाकण, म्हाळुंगे, मरकळ, तळेगाव आदी एमआयडीसीमधील जड अवजड वाहनांच्या अनुयायांच्या मार्गावर येण्यास मनाई करण्यात येत आहे. आळंदी मरकळ लोणीकंदकडे जाणाऱ्या व येणाऱ्या खाजगी हलकी, जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहने अलंकापुरम चौक (तापकीर चौक) डावीकडे वळून गोडावुन चौक मार्ग, चऱ्होलीफाटा देहुफाटा डावीकडे वळून नाशिक हायवेवरुन, चऱ्होली फाटा देहुफाटा चाकण चौक माजगाव एमआयडीसी चाकण मार्गे तसेच मरकळ एमआयडीसी, सोळु, धानोरेकडून येणारी हलकी व जड अवजड वाहने मरकळ गाव येथून डावीकडे वळून कोयाळी मार्गे रसिका हॉटेल चौकातून चाकण येथे जावून पुढे इच्छितस्थळी जातील,

विजयस्तंभ पेरणेफाटा येथे अभिवादनाकरिता जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनांकरीता वाहतुकीत बदल

नाशिककडून येणाऱ्या अनुयायांच्या बसेस चाकण मार्गे शिक्रापुर वाहनतळ तसेच मुंबईकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने येणाऱ्या अनुयायांच्या बसेस वडगाव फाटा-म्हाळुंगे-चाकण मार्गे शिक्रापूर वाहनतळाकडे जातील.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने येणारी अनुयायांची हलकी वाहने वडगाव फाटा-म्हाळुंगे-चाकण चौक-डावीकडे वळून- आळंदी फाटा,भारतमाता चौक, मोशी चौक-आळंदी-मरकळ-तुळापूरमार्गे लोणीकंद वाहनतळाकडे जातील. मुंबईकडून एक्सप्रेस महामार्गाने येणारी अनुयायांची हलकी वाहने उर्से टोलनाका येथून डावीकडेवळून वडगाव फाटा- म्हाळुंगे- चाकण चौक -आळंदी फाटा,भारतमाता चौक,मोशी चौकमार्गे आळंदी मरकळ तुळापुर मार्गे लोणीकंद वाहनतळ तसेच मुंबईकडून एक्सप्रेस हायवेने येणारी अनुयायांची हलकी वाहने मुकाई चौक मार्गे-सेंट्रल चौक -नाशिक फाटा मार्गे वाहनतळ ठिकाणी जातील.

नाशिककडून नाशिक-पुणे महामार्गाने येणारी अनुयायांची कार, जीप आदी हलकी वाहने चाकण चौकातून डावीकडे न वळता सरळ पुढे जाऊन आळंदी फाटा किंवा भारत माता चौक किंवा मोशी चौक, पांजरपोळ चौक या ठिकाणावरुन डावीकडे वळून आळंदी मरकळ मार्गे तुळापुरवरुन पुढे लोणीकंद येथे वाहनतळ ठिकाणी जातील. (मरकळ गाव, इंद्रायणी नदी पुलावर ८ फुट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेट लावले असल्याने त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने तेथुन जावू शकणार नाहीत त्यापेक्षा कमी उंचीच्या फक्त अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)

पुणे शहरातून विश्रांतवाडी चौक तसेच आळंदी फाटा या ठिकाणावरुन आळंदीच्या दिशेने अनुयायांची वाहनास मज्जाव करण्यात आला असून ही वाहने वाघोली मार्गे लोणीकंदकडे वाहनतळाच्या दिशेने जातील. हा आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड,पोलीस वाहने, रुग्णवाहीका, आदी) अनुयायांची वाहनेखेरीज करून तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.