मध्यराञी दरी पुलावर ट्रेलरचा अपघात; दोन जखमींची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

पुणे, ६ डिसेंबर २०२२ – आज दिनांक ०६•१२•२०२२ रोजी मध्यराञी ०३•३४ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात जांभुळवाडी, दरी पुल याठिकाणी सातारा ते पुणे या दिशेने येताना एक मोठा ट्रेलर अपघात होऊन पलटी झाल्याने त्याचा चालक जखमी अवस्थेत अडकला असल्याची वर्दि मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, मोठा ट्रेलर पलटी होऊन पुढील केबिनमधे सीटवर चालक जखमी अवस्थेत अडकला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या चालकाशी संवाद साधून धीर देत जवान शिवाजी मुजूमले व शिवाजी आटोळे यांनी तातडीने दलाकडील स्प्रेडर व कटर हे उपकरण वापरत तसेच एका क्रेनच्या मदतीच्या साह्याने जखमी चालकाला पंधरा मिनिटात जखमी अवस्थेत बाहेर काढून लगेच उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.

परंतू रस्त्यावर पलटी झालेला ट्रेलर पाहून एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना त्याने प्रथमदर्शनी प्रत्यक्ष हा अपघात पाहून मदतीकरिता पुढे आला असता त्या ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेत असल्याचे पाहताच सदर दुचाकीस्वाराने घाबरुन स्वतचा बचाव करण्याकरिता दरीपुलावरुन खाली उडी मारली होती नंतर काही वेळाने त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यावर दलाचे जवान व तेथे उपस्थित नागरिक यांच्या मदतीने त्या दुचाकीस्वारास ही जखमी अवस्थेत वर काढण्यात आले.

ट्रेलर क्रमांक एम एच ४६ – २९५० असा असून अपघाताचे नेमके कारण व दोन ही जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनातील तेल पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून धोका दुर केला आहे.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर व वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे तसेच तांडेल – शिवाजी मुजूमले व फायरमन शिवाजी आटोळे आणि मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे यांनी सहभाग घेतला. तसेच पीएमआरडीए अग्निशमन दल यांचे जवान ही मदतीकरिता दाखल झाले होते. पोलिस विभाग व उपस्थित असणारे नागरिक यांची ही मदत झाली.