October 8, 2025

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशिक्षण कक्ष स्थापन, पदनिर्देशित अधिकारी नियुक्त

पुणे, ७ ऑक्टोबर २०२५ : पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, निवडणुकीतील सर्व टप्प्यांवरील कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी महापालिकेत ‘निवडणूक प्रशिक्षण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदार यादी, मतदान केंद्र नियोजन, ईव्हीएम वापर, उमेदवारी अर्ज प्रक्रिया आणि निकाल व्यवस्थापन आदी बाबींवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

या कक्षाचे प्रमुख म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी व यशदा सहयोगी प्राध्यापक राजीव नंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रशासन अधिकारी संगीता कोकाटे आणि प्रशिक्षण प्रबोधिनीचे उपअधीक्षक संजय काळे हे सहाय्यक कक्ष प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. नियुक्त अधिकारी उपआयुक्त (निवडणूक) यांच्या समन्वयाने नियमित जबाबदाऱ्यांसह हे कामकाज पार पाडतील.

दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विभाजनाचे काम करण्यासाठी दोन पदनिर्देशित अधिकारी नेमले आहेत. उपायुक्त रवी पवार यांना प्रभाग क्रमांक १ ते १२, २५, २७ ते ३५ (एकूण २२ प्रभाग) तर उपायुक्त निखील मोरे यांना प्रभाग क्रमांक १३ ते २४, २६, ३६ ते ४१ (एकूण १९ प्रभाग) यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नव्याने मतदार यादी तयार करून ती प्रमाणित करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. या नियुक्त्यांमुळे निवडणुकीतील पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.