पीएमआरडीएकडून ४३७ भूखंडाचे महापालिकेला हस्तांतरण

पुणे, २५ जुलै २०२२: महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील ४३७ भूखंड पीएमआरडीएने ( पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ) महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. मात्र हे भूखंड कुठे आहेत, त्यावर अतिक्रमण आहे का याचा कुठलाच तपशील दिलेला नसून, केवळ या भूखंडाच्या कागदपत्रांच्या फाईलस् महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडे सूपूर्त करण्यात आल्या आहेत. यामुळे या कागदोपत्री हस्तातंरणाची सहानिशा महापालिकेकडून केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पीएमआरडीएकडून हस्तांतरित केलेल्या भूखंडात अंतर्गत रस्त्याचे १०१ भूखंड, प्रादेशिक योजना व विकास आराखड्यातील रस्ते व सुविधा क्षेत्राचे प्रत्येकी १६८ भूखंड असे एकूण ४३७ भूखंड महापालिककडे वर्ग करण्यात आले आहेत.
महापालिका हद्दीत प्रथम समाविष्ट झालेल्या ११ गावांनंतर ३३ गावांमधील रस्ते व सुविधा क्षेत्राचे भूखंड ताब्यात देण्यात यावेत, यासाठी महापालिकेकडून दीड वर्षापांसून पीएमआरडीएकडे पाठपुरावा सुरू होता. त्यास पीएमआरडीएने प्रतिसाद न दिल्याने अखेर महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केली. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी महसुल यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नियुक्त करून हे भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार गुरूवारी महापालिकेकडे सदर ४३७ भूखडांच्या हस्तांतरांच्या फाईल महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडे आल्या आहेत.

सदर भूखंड महापालिकेकडे आले असले तरी ते केवळ कागददोपत्री आले आहेत. परिणामी महापालिकेकडून या सर्व भूखंडांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून, त्याचे जीपीएस मॅपिंग करून मोजणी केली जाणार आहे. हे भूखंड देताना कोठे अतिक्रमण आहे का, त्याला कपांऊड आहे का याचा कोणताच तपशील पीएमआरडीएने दिलेला नाही. यामुळे या सर्व बाबींची माहिती घेण्याची कार्यवाही महापालिकेच्या मालमत्ता विभागाने सुरू केली असल्याची माहिती मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.
—————

त्या भूखंडांची माहिती घेतली जाणार
पीएमआरडीएकडून ४३७ भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले असले तरी यापैकी ८ जागा या लिलावाव्दारे विकसित करण्यात आल्या आहेत. या जागांचा लिलाव हा महापालिकेत गावे समाविष्ट होण्यापूर्वी झाला की तत्पूर्वी झाला याची माहिती महापालिका घेणार आहे.

————
वर्ग केलेल्या भूखंडाचा तपशील खालीलप्रमाणे

अ.क्र. तपशील एकूण भूखंड क्षेत्र चौ.मी. मध्ये
१ अंतर्गत रस्ते १०१ ११५९५०.२०

२ डीपी/ आरपीरोड क्षेत्र १६८ १६३१७२.६९
३ सुविधा क्षेत्र १६८ २३७३४८.३६

—-