October 25, 2025

महापारेषणच्या उर्से २२० केव्ही वीजवाहिनीत ट्रिपिंग; चाकण एमआयडीसी व पसिरात ४० मिनिटे वीज खंडित

पुणे, दि. २४ मार्च २०२५: महापारेषणच्या उर्से-चिंचवड २२० केव्ही वीजवाहिनीमध्ये सोमवारी (दि. २४) दुपारी १.३९ वाजता ट्रिपिंग आल्यामुळे पीजीसीआयएल तळेगाव ते चाकण ४०० केव्ही वीजवाहिनी मध्ये वीजभार वाढला. परिणामी भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसी व परिसरातील ८०० उच्चदाब व ४ हजार लघुदाब तसेच ३५ हजार घऱगुती, व्यावसायिक व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा २६ ते ३९ मिनिटे बंद होता.

याबाबत माहिती अशी की महापारेषणच्या उर्से-चिंचवड २२० केव्ही वीजवाहिनीमध्ये आज दुपारी १.३९ वाजता ट्रिपिंग आले. त्यामुळे १६३ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली व पीजीसीआयएल तळेगाव ते चाकण ४०० केव्ही वीजवाहिनीचा वीजभार वाढला. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके टाळण्यासाठी भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली आणि चाकण एमआयडीसीमधील महापारेषणच्या चाकण ४०० केव्ही, चाकण फेज दोन २२० केव्ही व ब्रीजस्टोन २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांना वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे महावितरणच्या एमआयडीसीमधील ३४ उपकेंद्राचाही वीजपुरवठा बंद झाला आणि चाकण एमआयडीसी व परिसरातील शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, संगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोरी, सारा सिटी, कुरुळी, नाणेकरवाडी, आळंदी फाटा, चिंबोली, निघोजे, मोई आदी गावांतील ८०० उच्चदाब व ४ हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक तसेच सुमारे ३५ हजार घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास २६ ते ३९ मिनिटे बंद राहिला.