पुण्यात कासवांची तस्करी उघडकीस, दोघे अटकेत

पुणे, दि. १ (प्रतिनिधी)- दुर्मिळ कासवांची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. श्रीकृष्ण अवधूत वंजारी आणि अर्थव शशिकांत देशमुख (रा.पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आरोपींना पिंपरी चिंचवड येथील मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाल्याची माहिती पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली आहे. वाकड परिसरात मानकर चौकात बेकायदेशीररित्या कासव विक्री करणारे येणार अ्रसल्याची माहिती वनविभागास मिळाली होती. त्यानंतर काहीच वेळात एकजण परिसरात दुचाकीवर आला त्यानंतर वन विभागाचे पथकाने त्याचा पाठलाग करुन श्रीकृष्ण वंजारी व अर्थव देशमुख यांना अटक केली. त्यांचे घराची झडती घेतली असता एका बॉक्समध्ये दोन कासव मृत अवस्थेत व एक जिवंत आढळून आले. त्यांची तपासणी केली असता एक इंडियन टेंट टर्टल व दोन इंडियन रुफड टर्टल या प्रजातीची असून ती दुर्मिळ व संरक्षित आहे. त्यानुसार आरोपींवर अवैधरित्या कासव बाळगल्याप्रकरणी व खरेदी-विक्री केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.