व्याजासाठी तरुणाचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक

पुणे, दि. २३/०५/२०२१: व्याजाचे घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे तरूणाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. दीपक प्रदिपकुमार सिंग (वय २०, रा. कात्रज) व निखील नंदकुमार कदम (वय २३,रा. दत्तनगर रोड, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. इतर फरार चौघांचा शोध सुरू आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याला एका आरोपीने १ लाख तर दुसऱ्याने ४० हजार रूपये व्याजाने दिले होते. दर महिन्याला २० हजार रूपये परत देण्याचे ठरले होते. मात्र, लॉकडाउन असल्यामुळे तरूणाने आरोपींना व्याज देता आले नाही. व्याज दिले नाही म्हणून आरोपींनी तरूणाचे १८ मे रोजी राहत्या घरातून अपहरण करून एका हॉस्टेलमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर त्याठिकाणाहून एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तरुणाने वडिलांना डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर वडिलांनी तत्काळ पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी तरुणाची सुटका केली.