पुणे: शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

सिंहगड रोड, ३ जुलै २०२२: तळ्यामध्ये पोहायला गेले असता दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना धायरी येथील रायकर मळ्यातील, खंडोबा मंदिराजवळ आज सकाळी ९ च्या सुमारास घडली. सुरज शरद सातपुते (१४) व पुष्कर गणेश दातखिंडे (१३) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.

“सुरज व पुष्कर आपल्या मित्रासमवेत खंडोबा मंदिरात गेले असता, ते दोघेही पाण्यात पोहण्यासाठी उतरले. काही वेळानंतर त्यांना पाण्यातून वर येणे कठीण जाऊ लागले व ते बुडाले. आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी तातडीने दाखल झालो”, असे प्रभाकर सुरेश उम्रातकर, (केंद्रप्रमुख, सिंहगड रोड अग्निशमन केंद्र) म्हणाले.

नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच सिंहगड रोड अग्निशमन केंद्र व पीएमआरडीए अग्निशमन केंद्रातून दोन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. अग्निशमन वाहने पोहोचताच गळाच्या साह्याने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही मुले नालंदा हायस्कूल शेजारी, धायरी येथे राहत.